मुंबई :- सातारा जिल्ह्यातील सैनिकी परंपरा लाभलेल्या अपशिंगे (मिलिटरी) गावाचा इतिहास संपूर्ण जगासमोर आणण्याच्या दृष्टीने संग्रहालय निर्मिती व त्या अनुषंगाने प्रस्तावित पायाभूत सुधारणा सुचविण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असून समितीने सुचविलेल्या शिफारशीनुसार अपशिंगे (मिलिटरी) गावाचा विकास करण्यात येईल असे माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. मंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात माजी सैनिक कल्याण विभागाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
सातारा जिल्ह्यातील सैनिकी परंपरा लाभलेल्या अपशिंगे गावाच्या विकासासाठी समिती स्थापन करणार – मंत्री दादाजी भुसे
पहिल्या महायुद्धाच्या काळात अपशिंगे या गावातील ९० टक्के लोक सैन्यात सहभागी झाले होते.या गावाने अनेक वीर सैनिक दिले.त्याचा इतिहास जतन करण्याची गरज आहे.त्या अनुषंगाने संग्रहालयाची निर्मिती,ग्रंथालय,स्टेडियम,प्रशिक्षण संस्था व पायाभूत सुविधा निर्माण करण्यात याव्यात.त्यासाठी जागेची पाहणी करावी.कृषी विभागाच्या वतीने तेथील शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ देण्यात यावा असे निर्देशही भुसे यांनी दिले.
सैन्यभरती मेळावे
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे सैन्यभरती बंद होती.ती पुन्हा सुरू करावी .त्यासाठी राज्यात विविध ठिकाणी सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.धुळे येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या आवारात माजी सैनिक व त्यांच्या परिवारासाठी बहुउद्देशीय सभागृह बांधकामाची सद्यस्थिती, सैनिक कल्याण विभागाचे संचालक, उपसंचालक पदांचे सुधारित सेवा प्रवेश नियम आदि बाबींवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.