मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर सातत्याने भाजपकडून खासकरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. भाजपकडून महाविकास आघाडीतील मंत्री हसन मुश्रीफ, अनिल परब, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि अन्य काही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. महाविकास आघाडीकडून यावर आरोपांचे खंडण करुन आरोप फेटाळले जात आहेत. तसेच काही मंत्र्यांनी सोमय्या यांच्यावर मानहानीचा दावा देखील करण्याबाबत सांगितले आहे.
भाजपला जशास तसे उत्तर देण्याच्या तयारीत महाविकास आघाडी
सातत्याने महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर होणाऱ्या आरोपांची दखल आता महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे. भाजपला जशास तसे उत्तर महाविकास आघाडी सरकार देखील देणार असल्याची माहिती आहे. फडणवीस सरकारच्या काळातील घोटाळ्यांची प्रकरणे महाविकास आघाडी सरकार बाहेर काढणार असल्याची माहिती आहे.
विशेष समिती फडणवीस सरकारच्या काळातील घोटाळ्यांची पोलखोल करण्यासाठी तयार केल्याची देखील सूत्रांची माहिती आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षातील एका सदस्यांचा समितीमध्ये समावेश असणार आहे. यामुळे लवकरच भाजपच्या माजी मंत्र्यांची देखील घोटाळ्याची प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता आहे.