वायु प्रदूषणामुळे जगभरात होतो दरवर्षी सत्तर लाख लोकांचा मृत्यू


नवी दिल्ली : सध्याच्या घडीला वायु प्रदूषण ही एक गंभीर समस्या बनत असून दरवर्षी जगभरात वायु प्रदूषणामुळे सत्तर लाखाहून अधिक लोक आपला जीव गमावत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. सहा प्रमुख घातक प्रदूषकांच्या संबंधित नव्या गाईडलाईन्स जागतिक आरोग्य संघटनेने जारी केल्या असून सर्व देशांनी त्याचे पालन करावे असे आवाहनही केले आहे.

PM 2.5, PM 10, ओझोन, नायट्रोजन डाय ऑक्साईड, सल्फर डाय ऑक्साईड आणि कार्बान मोनोक्साईड या सहा घातक समजल्या जाणाऱ्या प्रदूषकांच्या संबंधी जागतिक आरोग्य संघटनेने नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या प्रदूषकांच्या संबंधित या आधी 2005 साली मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली होती. आता त्याहून अधिक कडक मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. जगातील सर्व देशांना कायदेशीररित्या ही मार्गदर्शक तत्वे बंधनकारक नाहीत, पण हवा प्रदूषणाच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी निश्चितपणे उपयोगी पडतील, असे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.

PM 2.5 या प्रदूषकामुळे हवा प्रदुषणामुळे होणाऱ्या मृत्यूपैकी 80 टक्के मृत्यू हे होतात. त्यामुळे हे प्रदूषक सर्वाधिक धोकादायक समजले जाते. या आधी 2009 साली भारताने या प्रदूषकांच्या संबंधित जागतिक आरोग्य संघटनेच्या धर्तीवर मार्गदर्शक तत्वे जारी केली होती. आता नवी मार्गदर्शक तत्वे ही पुढच्या वर्षी म्हणजे 2022 पर्यंत तयार केली जातील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 2017 सालच्या तुलनेत 2024 पर्यंत देशातून PM 2.5 चे प्रमाण 20 ते 30 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे ध्येय भारताने ठेवले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही