ब्राझील आरोग्य मंत्री करोनाच्या विळख्यात

संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७६ व्या सत्रात सामील झालेले ब्राझीलचे आरोग्य मंत्री मार्सेलो क्वेरोगा यांची करोना चाचणी पोझिटिव्ह आली असल्याने एकच हडकंप माजला आहे. मार्सेलो ब्राझीलचे राष्ट्रपती बोल्सोनारो यांच्या सह न्युयॉर्क मध्ये सुरु असलेल्या या सत्रात सामील होण्यासाठी आले असून ते सत्रात आणि अन्य बैठकांत सुद्धा सामील झाले होते. त्यामुळे ब्राझील दलाच्या संपर्कात आलेल्या अन्य नेत्यांना करोना संक्रमणाचा धोका निर्माण झाला आहे.

ब्राझील तर्फे या संदर्भात दिलेल्या स्पष्टीकरणात मार्सेलो यांनी करोना लस घेतली आहे आणि महासभेच्या सर्व कार्यक्रमात त्यांनी मास्क वापरला आहे. ब्राझीलच्या दलाच्या करोना चाचणीत अन्य कुणाही सदस्याचा रिपोर्ट पोझिटिव्ह आलेला नाही. त्यामुळे मार्सेलो यांना न्युयॉर्क मध्ये क्वारंटाइन करण्यात आले असून त्यांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आल्यावर ते ब्राझीलला परतणार आहेत.

ब्राझील राष्ट्रपती बोल्सोनारो यांनी करोना लस घेतलेली नाही. बोल्सोनारो यांनी ब्रिटीश पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांची भेट घेतली तेव्हा मार्सेलो तेथे उपस्थित होते. अन्य राजकीय नेत्यांच्या भेटीवेळी सुद्धा मार्सेलो उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्यात संक्रमण पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. लस घेतली नाही म्हणून ब्राझील राष्ट्रपती बोल्सोनारो यांना न्युयॉर्क रेस्टॉरंट मध्ये प्रवेश नाकारला गेला आणि त्यांना रस्त्यात उभे राहून पिझा खावा लागला याचे फोटो सोशल मीडियावर नुकतेच व्हायरल झाले आहेत. तो पर्यंत हे दुसरे प्रकरण समोर आले आहे.