संजय राऊतांनी माझ्यावरील मानहानीची रक्कम वाढवावी, माझी किंमत नक्कीच सव्वा रुपया नाही – चंद्रकांत पाटील


मुंबई : माझ्यावरील मानहानीची रक्कम संजय राऊतांनी वाढवावी. माझी किंमत सव्वा रुपया नक्कीच नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. एकमेकांना आपल्या संस्कृतीत चिमटे घेतले जातात, पण जखम होत नाही. त्यांनी माझी किंमत नक्की ठरवावी, पण माझी किंमत सव्वा रुपया नक्की नाही. मला संधी मिळेल त्यावेळी सातत्याने बोलणारे, सातत्याने लिहिणारे असा अवार्ड द्यायचा झाला, तर मी संजय राऊतांना देईल. शिवसेनेमधील दुसरे कुणी काही बोलत नाही. फक्त संजय राऊतच बोलतात. त्यासाठी तयारी करावी लागते, असेही ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील संजय उपाध्याय यांच्या उमेदवारीवरुन म्हणाले की, महाराष्ट्रात काहीही होऊ शकते. 56 वाले मुख्यमंत्री होऊ शकतात तर 54 वाले उपमुख्यमंत्री आणि 44 वाले महसूलमंत्री होऊ शकतात. तर 106 आणि 13 अपक्ष असे 119 वाले राज्यसभेत का जाणार नाहीत. संजय उपाध्याय राज्यसभेवर जाणारच, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. राज्यपाल-मुख्यमंत्री लेटर वॉरवर चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यातील जनता हा रोजचा खेळ पाहत आहे. राज्यपाल हे प्रमुख आहेत, त्यांच्या सहीने विधानसभा बोलवता येते.