२४ तासांत मुंबई पोलिसांनी माफी मागावी; किरीट सोमय्या


मुंबई – कोल्हापूर दौऱ्यात अडथळा आणल्यामुळे मुंबईत पोलिसांविरोधातच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार केली आहे. मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात किरीट सोमय्या यांनी ही तक्रार दाखल केली आहे. मुंबई पोलिसांनी २४ तासांत माफी मागावी, अशी आमची मागणी असल्याचे किरीट सोमय्या यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. अशा प्रकारे उद्धव ठाकरे आणि शरद पवार लोकशाही चालवणार आहेत का? असा सवालही यावेळी त्यांनी विचारला. तसेच कोल्हापूरच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणादेखील त्यांनी यावेळी केली.

कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी असताना मला घरात कोंडून ठेवण्यात आले. कायदेशीर नोटीस दिल्यावर जाऊ दिले आणि त्यानंतर सीएसटीबाहेर मी जाऊ नये, यासाठी ठाकरे सरकारच्या पोलिसांनी गुंडगिरी केली म्हणून अधिकृत तक्रार करण्यासाठी मी आलो असल्याचे किरीट सोमय्या यांनी यावेळी सांगितले.

आज कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि एसपींना मी पुन्हा पत्र लिहिले आहे. २० तारखेच्या स्थगित झालेल्या दौऱ्यासाठी मी पुढील मंगळवार आणि बुधवारी जाणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. दरम्यान त्यांनी दौऱ्यासाठी परवानगी मिळेल का? असे विचारण्यात आले असता ते म्हणाले की, अशाप्रकारे उद्धव ठाकरे आणि शरद पवार लोकशाही चालवणार आहेत का? किरीट सोमय्याला एवढे का घाबरतात? उद्धव ठाकरेंचे १९ बंगले पाहण्यासाठी उद्या गेल्यानतंर हे काय करणार?.