हिंदू सेनेकडून असदुद्दीन ओवेसींच्या दिल्लीतील निवासस्थानाची तोडफोड


नवी दिल्ली – अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी तोडफोड केली. आंदोलन करत हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी ओवेसींच्या घराची तोडफोड केली. आपल्या जाहीर सभांमध्ये हिंदूंच्या विरोधात ओवेसींनी प्रक्षोभक वक्तव्य करू नये, ज्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील आणि जेणेकरून भविष्यात तुमच्या विरोधात आंदोलन करण्याची वेळ येईल, असे हिंदू सेनेने म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी पाच लोकांना ताब्यात घेतले आहे.

मंगळवारी हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या २४-अशोक रोड, नवी दिल्ली येथील निवासस्थानी हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली आणि तोडफोड केली. आंदोलकांनी ओवेसी यांच्या घराबाहेर नेम प्लेट, दिवा आणि खिडकीच्या काचा फोडल्या. या दरम्यान असदुद्दीन ओवेसी त्यांच्या निवासस्थानी उपस्थित नव्हते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांमध्ये खळबळ उडाली. घटनेनंतर नवी दिल्ली उच्च पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाच जणांना ताब्यात घेतले.

उत्तर प्रदेशात हिंदूविरोधी वक्तव्यांसाठी ओवेसींविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता आणि काही वर्षांपूर्वी त्याच्या भावालाही हिंदूविरोधी वक्तव्य केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. ओवेसी बंधू नेहमीच मुस्लिमांना आकर्षित करण्यासाठी हिंदूंचा अपमान करण्याचा प्रयत्न करत असतात, असे हिंदू सेनेने म्हटले आहे.

असदुद्दीन ओवेसी यांनी घरावरील हल्ल्यानंतर भाजप या धर्मांधतेला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. लोकांच्या या धर्मांधतेसाठी भाजप जबाबदार असून एखाद्या खासदारांच्या घरावर अशा प्रकारे हल्ला झाल्यास त्यातून काय संदेश जातो?, असे ओवेसी यांनी म्हटले.