लस न घेतल्याने ब्राझील राष्ट्रपतींना रस्त्यावर खावा लागला पिझा

संयुक्त राष्ट्र महासभा (युएनजीए) संमेलनासाठी न्युयॉर्क मध्ये आलेले ब्राझीलचे राष्ट्रपती जेआर बोल्सोनोव यांच्यावर रविवारी रेस्टॉरंट बाहेर रस्त्यावर उभे राहून पिझा खाण्याची पाळी आली.  या संदर्भातले फोटो बोल्सोनोव्ह यांच्या दोन कॅबिनेट मंत्र्यांनी शेअर केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार बोल्सोनोव्ह यांनी कोविड लसीचा एकही डोस अद्यापी घेतलेला नाही. न्युयॉर्कमधील या रेस्टॉरंटने कोविड नियमावलीनुसार कोविड लस न घेतलेल्यांना रेस्टॉरंट मध्ये प्रवेश बंदी केली असून हाच नियम राष्ट्राध्यक्ष बोल्सोनोव्ह यांनाही लागू करण्यात आला.

ब्राझील मध्ये करोनाने लाखो बळी घेतले आहेत मात्र करोना लसीबद्दल शंका असल्याने राष्ट्रपती बोल्सोनोव्ह यांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. इतकेच नव्हे तर आपण लस कशी घेतली नाही याची प्रौढी ते अनेकदा मारतात. न्युयॉर्क दौऱ्यावर येण्यापूर्वी सुद्धा त्यांनी,’ माझी प्रतिकारशक्ती इतकी भक्कम आहे की करोना सहज पराभूत होतो, असे वक्तव्य केले होते. सोमवारी ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन यांनी बोल्सोनोव्ह यांना लस घेतली का असा प्रश्न केला तेव्हा त्यांनी अजून तरी नाही असे उत्तर दिले होते.

न्युयॉर्कच्या मेयरनी शहरात महासभा कार्यक्रमात सामील होण्यासाठी येणाऱ्या सर्व देशप्रमुखाना करोना लस घेण्याचे अन्यथा शहरात न येण्याचे आवाहन केले होते असेही समजते.