मराठी फिल्म अभिनेत्री ईश्वरी देशपांडे हिचा गोवा येथे झालेल्या कार अपघातात मृत्यू झाला आहे. तिच्यासोबत तिचा मित्र शुभम देडगे होता आणि त्याचाही या अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ईश्वरी आणि शुभम यांची कार बागा क्रिकवरून खोल पाण्यात पडली होती. कार सेंट्रल लॉक असल्याने त्या दोघांना कार बाहेर पडता आले नसावे असा तर्क पोलिसांनी व्यक्त केला आहे. सोमवारी सकाळी अग्निशमन दलाच्या मदतीने या दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.
कार कोण चालवत होते हे समजू शकलेले नाही. मात्र कार वेगात असावी आणि गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती पुलावरून खाली पाण्यात कोसळली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. ईश्वरी आणि शुभम लहानपणापासून मित्र असून पुढच्या महिन्यात त्यांचा साखरपुडा होता असेही समजते. हे दोघे १५ सप्टेंबर ला गोव्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच ईश्वरीने मराठी आणि हिंदी प्रोजेक्टचे शुटींग पूर्ण केले होते. २५ वर्षीय ईश्वरी प्रेमाचे साईड इफेक्ट या फिल्म मधून मराठी चित्रपट डेब्यू करणार होती.