ई-पीक पाहणी व प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा – बाळासाहेब थोरात


मुंबई : ई–पीक पाहणी व प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या दोन्ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असून महसूल व कृषी या दोन्ही विभागांनी समन्वयाची भूमिका घ्यावी व जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. ई-पीक पाहणी व प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंमलबजावणीसंदर्भात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषि मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत राज्यातील तहसीलदार, तलाठी, तालुका कृषि अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्या संघटनांसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार, जमाबंदी आयुक्त एन.के.सुधांशू यांच्यासह तहसीलदार, तलाठी, तालुका कृषि अधिकारी, कृषी सहाय्यक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ई-पीक पाहणी हा प्रकल्प कृषी, महसूल, पणन व इतर विभागांसाठी लाभदायक ठरणार असून हा प्रकल्प देशासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वासही महसूल मंत्री थोरात यांनी व्यक्त केला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत अनेक शेतकऱ्यांचे अर्ज दुरुस्ती अभावी प्रलंबित आहेत. ते अर्ज येत्या नोव्हेंबर अखेरपर्यंत निकाली काढावेत, अशी सूचना थोरात यांनी केली.

कृषि मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, महसूल व कृषी विभाग शेतकऱ्यांसाठी कार्य करीत असून पीकविमा, नैसर्गिक आपत्ती इत्यादी विषयात दोन्ही विभाग समन्वयाने काम करीत असतात. त्याचप्रमाणे ई-पीक पाहणी व प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या दोन्ही योजनामध्ये टीम वर्क करून योजना राबविताना काही अडचणी असल्यास समन्वयाने मार्ग काढावा. ई – पीक पाहणी प्रकल्पात काही सुधारणा करणे गरजेचे असेल तर त्या अवश्य केल्या जातील.

एकही शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहता कामा नये
ई – पीक पाहणी व प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या दोन्ही योजनांच्या लाभापासून राज्यातील पात्र शेतकरी वंचित राहणार नाहीत याची सर्व यंत्रणांनी काळजी घ्यावी. ई – पीक पाहणी प्रकल्पात सातबारावर पिकांची नोंद घेण्याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजून सांगावे, असे आवाहनही मंत्री भुसे यांनी केले.