शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडला असे नाही, तर त्यांना पक्षाबाहेर काढण्यात आले – रामदास आठवले


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे अनंत गीते यांच्या वक्तव्यापासून शिवसेनेने फारकत घेतली असून दुसरीकडे त्यांच्यावर राष्ट्रवादीने घणाघाती टीका केली आहे. सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांच्या टीकेला अडगळीतले नेते असा उल्लेख करत उत्तर दिले आहे, दरम्यान अनंत गीते यांचं वक्तव्य योग्य नसल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

अनंत गीते यांचे वक्तव्य योग्य नसून शरद पवार हे सन्माननीय नेते आहेत. कोणत्या पक्षाचे नेते नाहीत हे खरे आहे, पण ते महाराष्ट्राचे नेते आहेत. काँग्रेस पक्ष शरद पवार यांनी सोडला असे नाही, तर त्यांना काँग्रेसमधून बाहेर काढण्यात आल्यामुळे शरद पवारांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असा होत नसल्याचे रामदास आठवलेंनी म्हटले आहे.

शरद पवारांवर एवढा गंभीर आरोप केला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेनेने राहू नये. शिवसेनेने पुन्हा एकदा स्वगृही परतत, भाजपा, आरपीआयसोबत मिळून बाळासाहेबांचे शिवशक्ती भिमशक्ती स्वप्न साकार केले पाहिजे, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे.

ते पुढे म्हणाले की, शिवसेनेला भवितव्य उज्वल करायचे असेल, तर काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत राहणे त्यांचे नुकसान आहे. अडीच वर्षांचा जो फॉर्म्यूला आहे, त्यावर एकमत करुन भाजप-सेनेने एकत्र यावे आणि राज्याच्या विकासाला प्रगती द्यावी. केंद्राकडून जास्तीत जास्त निधी मिळवत मुंबई आणि राज्याचा विकास करावा. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला पाहिजे. ऑक्टोबरच्या दसरा मेळाव्याआधी त्यांनी भाजपासोबत आले पाहिजे.

सध्या या तिन्ही पक्षांत धुसमूस सुरु असून सातत्याने एकमेकांवर आरोप केले जात आहेत. एकमेकांवर रोज गंभीर आरोप करणे आणि परत सत्तेत राहणे परवडणारं नाही. काँग्रेसने पाठिंबा काढावा किंवा शिवसेनेने मुख्य प्रवाहात म्हणजेच भाजपसोबत यावे. अडीच वर्ष उद्धव ठाकरे आणि अडीच वर्ष फडणवीस यांनी मुख्यंमंत्री राहावे. पुढच्या निवडणुका एकत्रित लढून महाराष्ट्राचे भले करावे, असेही यावेळी त्यांनी म्हटले आहे.