शरद पवार आमचे नेते होऊच शकत नाहीत; माजी खासदार अनंत गीते


रायगड : शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी शरद पवार आमचे नेते होऊ शकत नसल्याचे वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला, असा घणाघातही त्यांनी केला आहे. केवळ तडजोड महाविकास आघाडीत असल्याचेही अनंत गीते म्हणाले आहेत.

अनंत गीते पुढे म्हणाले की, दुसरा कोणताही नेता, त्याला जगाने कितीही उपाध्या देवोत, त्याला कोणी जाणता राजा म्हणो, पण तो आमचा गुरु होऊच शकत नाही, बाळासाहेब ठाकरेच फक्त आमचे गुरु होते आणि राहतील. महाविकास आघाडी ही सत्तेची तडतोड आहे. जोपर्यंत आहे, तोपर्यंत आहे. ज्यादिवशी तुटेल त्यादिवशी काय?

काँग्रेस सुद्धा काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी सुद्धा काँग्रेस आहे, तरी एकमेकांचे तोंड बघत होते का, त्यांचे एकमेकांशी कधी जमत होते का, यांचा विचार एक आहे का ? एक विचारांची दोन काँग्रेस होऊ शकत नाही, तर काँग्रेस विचारांची शिवसेना ही कदापी होऊ शकणार नाही. मुळात राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला असल्याचे ते म्हणाले.