मुंबई : महंत नरेंद्र गिरी महाराज यांच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. महाराष्ट्रातील पालघरमध्ये ज्यावेळी अशीच काहीशी घटना घडली होती, राज्य सरकारवर त्यावेळी मोठा दबाव टाकण्यात आला होता. अशातच आताही या मृत्यूप्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत करण्यात यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊतांची भाजपवर महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यू प्रकरणावरुन टीका
संजय राऊत पुढे म्हणाले की, महंत नरेंद्र गिरी महाराज यांच्या मृत्यूचे जे प्रकरण समोर आले आहे, ते अत्यंत रहस्यमय आहे. कोणी जरी आत्महत्या म्हणत असेल, तरी त्यांच्या भक्तांना ती हत्या वाटत आहे. त्यामागे कोणते षड्यंत्र आहे, नक्की काय आहे? याचा तपास होणे गरजेचे आहे. पालघरमध्ये काही साधूंचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला, तेव्हा तो हिंदुत्वावर हल्ला असा आवाज भाजपने देशभरातून उठवला होता.
पण नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूंचे प्रकरण समोर आले त्यातून कुणीतरी उत्तर प्रदेशमध्ये हिंदुत्वाचा गळा घोटलेला दिसत आहे. याची चौकशीसुद्धा सीबीआयकडून व्हावी. तसेच नरेंद्र गिरींच्या भक्तांची देखील मागणी आहे. हा मृत्यू अत्यंत रहस्यमय आहे. ते आत्महत्या करतील, असे मला वाटत नाही. याची कारणे शोधायला पाहिजे आणि ती कोणी शोधायची हे ठरवायला हवे. हिंदुत्वाचा गळा कोणीतरी घोटला असेच क्षणभर वाटले.