पावलांवर आणि टाचांवर सतत सूज येत असल्यास अवलंबा हे उपाय


पावलांवर किंवा टाचांवर सूज येण्याची समस्या सामान्य असून, यासाठी अनेक कारणे असू शकतात. बरोबर फिट न बसणारी चप्पल, किंवा बूट, पुष्कळ वेळ सातत्याने बसल्याने किंवा उभे राहिल्याने, महिल्यांचे गर्भारपण, ‘वॉटर रिटेन्शन’, अथवा ‘एडीमा’, शरीरामध्ये काही पोषक तत्वांची कमतरता, तसेच इतरही अनेक विकारांमुळे पावलांवर आणि टाचांवर सूज येऊ शकते. बहुतांशवेळी पावलांवर किंवा टाचांवर सूज आल्याने प्रत्यक्ष वेदना होत नसली, तरी ही सूज अतिशय त्रासदायक ठरू शकते. अनेकदा ही सूज कमी करण्याकरिता औषधे घेतली जातात. या औषधांमुळे सूज तात्पुरती कमी होत असली, तरी काही काळाने पुन्हा उद्भवू लागते. त्यामुळे केवळ सूज कमी करण्यासाठी औषधोपचार न घेतले जाता, ही सूज नेमकी कश्यामुळे येत आहे याचे निदान करवून घेऊन त्याप्रमाणे औषधोपचार ठरविण्याने खचितच फायदा होतो. या बाबतीत काही घरगुती उपचारही उपयुक्त ठरू शकतात.

हायड्रोथेरपी, म्हणजेच आळीपाळीने गार आणि गरम पाण्याने शेक घेतल्यास पावलांवरील आणि टाचांवरील सूज कमी होण्यास मदत होते. गरम पाण्याच्या शेकाने पायातील ब्लड व्हेसल्स स्फुरण पावतात, तर थंड पाण्याच्या शेकाने आकुंचन पावतात. या क्रियेमुळे पायाकडील रक्तप्रवाह सुधारून पावलांवरील सूज कमी होण्यास मदत होते. ही उपचार पद्धत अवलंबण्यासाठी आधी गरम पाण्यामध्ये काही मिनिटे पावले बुडवावीत, आणि त्यानंतर त्वरित थंड पाण्यामध्ये पावले बुडवावीत. हा उपाय सलग पंधरा मिनिटे करावा. एप्सम सॉल्टमध्ये असणारे मॅग्नेशियम सल्फेट सूज कमी करून रक्ताभिसरण सुधारणारे आहे. त्यामुळे सूज कमी करण्यासाठी गरम पाण्यामध्ये एप्सम सॉल्ट घालून त्यामध्ये काही काळ पाय बुडवून ठेवल्याने पावलांवरील सूज त्वरित कमी होऊन वेदनाही नाहीशी होते.

पावलांवर येणारी सूज कमी करण्यासाठी खास तयार करण्यात येणारे कॉम्प्रेशन सॉक्स पावलांवरील सूज आणि वेदना कमी करण्यास सहायक आहेत. या सॉक्समुळे पावलांवर दबाव येत असल्याने पावलांवर फ्लुइड रिटेन्शनमुळे येणारी सूज कमी होण्यास मदत होते. हे कॉम्प्रेशन सॉक्स कोणत्याही मेडिकल स्टोरमध्ये सहज उपलब्ध असतात. पावलांवर आणि टाचांवर सूज आली असता, आडवे पडून पायांखाली जाड उश्या घ्याव्यात. काही मिनिटे पाय या उश्यांवर ठेवावेत, आणि त्यानंतर खाली काढून घ्यावेत. ही प्रक्रिया चार ते पाच वेळा करावी. त्यामुळे पायांवरील सूज कमी होण्यास मदत होते. पावलांना हलक्या हाताने मालिश केल्याने लिम्फॅटिक सिस्टम सक्रीय होत असून फ्लुइड रिटेन्शनमुळे पावलांवर आलेली सूज कमी होण्यास मदत होते. मात्र पावलांना मालिश करताना पावलांवर दाब देऊन मालिश करू नये. मालिश केल्याने पायाकडील रक्ताभिसरण सुधारून सूज कमी होते. दररोज सकाळी स्नान झाल्यानंतर पावलांवर मालिश करावी.

अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये पोटॅशियम मुबलक मात्रेमध्ये असून त्यामुळे शरीरातील फ्लुइड रिटेन्शन आणि परिणामी त्याद्वारे येणारी सूज कमी होते. अॅपल सायडर व्हिनेगरचा वापर करण्यासाठी गरम पाण्यामध्ये सम प्रमाणात अॅपल सायडर व्हिनेगर घालावे, आणि या पाण्यामध्ये टॉवेल बुडवून घेऊन तो पिळून आपल्या पावलांच्या भोवती लपेटावा. त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये मॅग्नेशियमने परिपूर्ण असलेले पदार्थ समाविष्ट करावेत. सुकामेवा, मासे, पालेभाज्या, केळी, डार्क चॉकोलेट इत्यादी पदार्थांमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण मुबलक असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment