देशात ज्याठिकाणी मशिदींसाठी मंदिरे पाडली गेली, त्याठिकाणी मंदिरे बांधणार भाजप – संगीत सोम


लखनौ – मशिदींसाठी देशातील ज्या ठिकाणी मंदिरे पाडली गेली, भाजपकडून त्या सर्व ठिकाणी मंदिरे बांधली जातील, असे वक्तव्य उत्तर प्रदेशमधील भाजप आमदार संगीत सोम यांनी केले आहे. नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सरधानाचे आमदार संगीत सोम हे चर्चेत असतात. सोम यांनी योगी सरकारचे साडेचार वर्ष पूर्ण झाल्यामुळे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना अखिलेश यादव हे हंगामी हिंदू असल्याचे म्हटले आहे. तसेच सपा प्रमुखांमध्ये हिंमत असल्यास, मथुरेतील मंदिर पाडून तिथे मशीद बांधली, असे बोलून दाखवण्याचे आव्हान सोम यांनी दिले.

मथुरा मशीद आणि वाराणसीची ज्ञानवापी मशीद संघ परिवाराने बाबरी मशीद पाडण्यापूर्वीच्या वर्षांमध्ये फ्लॅशपॉईंट म्हणून ओळखली होती. दरम्यान, भारतातील मुस्लिमांसह प्रत्येकजण हा हिंदू असल्याचा दावाही सोम यांनी केला. ते म्हणाले, अखिलेश यादव हंगामी हिंदू आहेत. ते येथे चालणार नाहीत, भारतात प्रत्येकजण हिंदू आहे, मुस्लिमही हिंदू आहे, हिंदूही हिंदू आहे आणि हिंदुस्थान हा हिंदूंचा आहे.

पुढे सोम म्हणाले, अखिलेश यादव सारखे लोक म्हणत आहेत की ते विश्वकर्मा मंदिर बांधतील, हे तेच लोक आहेत ज्यांनी राम भक्तांवर गोळीबार केला. ज्यांनी बनारसमध्ये साधूंवर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले? हे लोक आता हात जोडून माफी मागत आहेत. पण लोक त्यांना माफ करणार नाही.