या अतिप्रगत देशात गुन्हेगार शोधासाठी पोलीस घेतात तांत्रिकाची मदत

२१ वे शतक तंत्रज्ञांचे शतक म्हटले जाते. आज अनेक महत्वाची कामे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सहज पार पाडली जातात आणि लहान मुलांपासून अति वृध्द व्यक्ती सुद्धा या सहज सुलभ तंत्रज्ञानाचा वापर करतात हे पाहायला मिळते. तंत्रज्ञान विकासामुळे गुन्हे करण्याच्या पद्धतीत जसा आधुनिकपणा आला आहे तसाच गुन्ह्याचे तपास लावण्यात सुद्धा तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावते आहे याचाही अनुभव येत आहे.

पूर्वी गुन्हा तपास करताना पोलीस अनेक प्रकारे गुन्हेगारांचे माग काढणे, पुरावे गोळा करणे यासाठी काळजीपूर्वक काम करत असत. आधुनिक तंत्रामुळे त्यात खुपच सुधारणा झाली आहे. तरीही आजही अत्याधुनिक, प्रगत अशी ओळख असलेल्या सुपरपॉवर अमेरीकेतील पोलीस गुन्हा तपासासाठी तांत्रिकाची मदत घेतात हे सांगितले तर कुणाचा विश्वास बसणार नाही.

जादूटोणा, तांत्रिक मांत्रिक आजही डिमांड मध्ये असल्याचा हा पुरावा म्हणावा लागेल. अमरिकेतील डॅन बाल्डविन नावाच्या व्यक्तीने असा दावा केला आहे. त्याच्यामते त्यांच्या तंत्रविद्येच्या ज्ञानाने त्याने अनेक पोलिसांना अनेकदा गुन्हेगार शोधण्यात मदत केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बाल्डविनने त्याच्या या अद्भूत शक्तीविषयी एका शो मध्ये माहिती दिली. तो म्हणाला, एकदा अचानक त्याला ‘ जा, अपहरण झालेल्या मुलाचा शोध घे’ असा आवाज ऐकू आला. तेव्हा त्याने तंत्रविद्येत प्रवीण असलेल्या त्याच्या मित्राकडून ही विद्या आत्मसात केली आणि अडचणीत सापडलेल्या लोकांना मदत करायला सुरवात केली. पेंड्यूलम म्हणजे लंबकाच्या सहाय्याने तो अपहरण झालेली व्यक्ती कुठल्या स्थानी असेल हे सांगतो आणि गुन्हेगाराचे वर्णन करतो. त्याने या प्रकारे अनेक गुन्हे शोधले आहेत.

बरेच लोक अश्या गुन्ह्याच्या तपासासाठी त्याची मदत घेतातच पण पोलीस सुद्धा अशी मदत घेतात असे तो सांगतो. त्याच्या पेंड्यूलमने आजपर्यंत नेहमीच खरी माहिती दिली आहे असाही त्याचा दावा आहे.