हे आहे जगातील सर्वात रहस्यमयी पुस्तक


मनुष्याने वैज्ञानिक प्रगती करीत अनेक प्राचीन, नैसर्गिक आणि मानवनिर्मित रहस्यांचा उलगडा केला असला, तरी काही रहस्यांची उकल मात्र आजतागायत होऊ शकलेली नाही. यामध्ये एक रहस्य एका प्राचीन पुस्तकाशी निगडित आहे. या पुस्तकाला २४० पृष्ठे असून, या सर्व पानांवर नक्की काय लिहिले गेले आहे याची उकल आजवर कोणीच करू शकलेले नाही. इतिहासकार आणि पुरातत्ववेत्त्यांच्या मतानुसार हे रहस्यमयी पुस्तक सुमारे सहाशे वर्षांपूर्वी लिहिले गेले आहे. या पुस्तकाचे कार्बन डेटिंग केले गेले असता, हे पुस्तक पंधराव्या शतकामध्ये लिहिले गेले असल्याचे तज्ञांचे मत आहे. हे पुस्तक संपूर्ण हस्तलिखित स्वरूपात असून, यामध्ये लिहिलेली भाषा आणि लिपी कोणती आहे, यातील अनेकविध चिन्हांचे अर्थ नेमके काय आहेत हे मात्र आजवर कोणीही सांगू शकलेले नाही.

या पुस्तकातील लिपीला पुरातत्ववेत्त्यांनी आणि इतिहासकारांनी ‘वॉयनिक स्क्रिप्ट’ असे नाव दिले असून, इटालियन बुक डीलर विल्फ्रेड वॉयनिक यांच्या नावावरून या पुस्तकाला हे नाव देण्यात आले आहे. यामध्ये मनुष्य, प्राणी-पक्षी आणि इतरही अनेक वस्तूंच्या रेखाकृती आहेत. तसेच या पुस्तकामध्ये अशीही काही चित्रे आहेत, ज्यातील वस्तू पृथ्वीवर अस्तित्वात नसल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. विल्फ्रेड वॉयनिक यांच्या हाती हे पुस्तक १९१२ साली लागले असून हे पुस्तक त्यांना जेव्हा मिळाले, तेव्हा या पुस्तकाला बरीच पृष्ठे होती. कालांतराने या पुस्तकातील पुष्कळशी पाने नष्ट झाली असून, आता केवळ २४० पृष्ठे शिल्लक राहिली आहेत.

या पुस्तकातील लिपी किंवा भाषा कोणती आहे याचा शोध अद्याप लागू शकला नसला, तरी यामध्ये काही लॅटीन आणि जर्मन भाषेतील शब्दही आढळले आहेत. मात्र या शब्दांवरून या पुस्तकामध्ये नेमके कसले उल्ल्केख आहेत हे मात्र आजवर समजू शकलेले नाही. किंबहुना पुस्तकातील माहिती गुप्त रहावी याच बेताने अश्या रहस्यमयी लिपीमध्ये आणि भाषेमध्ये हे पुस्तक लिहिले गेल्याचे अनेकांचे म्हणणे असून, या पुस्तकचे रहस्य मात्र पुस्तक लिहिणाऱ्यासोबतच काळाच्या उदरात गडप होऊन गेले आहे.

Leave a Comment