अॅक्ने -निरनिराळे प्रकार आणि त्यासाठी घरगुती उपचार.


अॅक्ने म्हणजे चेहऱ्यावर येणारी मुरुमे किंवा पुटकुळ्या, पिंपल्स असा सर्वसाधारण समज असतो. मात्र केवळ चेहऱ्यावर नाही, तर मान, गळा, छाती, खांदे आणि पाठीवरील त्वचेच्या खाली किंवा त्वचेवर येणाऱ्या पुटकुळ्यांना अॅक्ने म्हटले जाते. अॅक्नेची समस्या प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कधी ना कधी जाणवतेच. काहींच्या बाबतीत ही समस्या चेहऱ्यावर किंवा इतरत्र केवळ एखादी पुटकुळी येण्यापर्यंत मर्यादित असते, तर काहींच्या बाबतीत ही समस्या अतिशय गंभीर स्वरूप धारण करणारी असते. अॅक्नेची समस्या सर्वसामान्य समस्या असून, त्वचेखाली साठून राहणारे तैलीय पदार्थ आणि हेअर फॉलिकल्स यांच्यामुळे मुरुमे, पुटकुळ्या, ब्लॅकहेड्स, व्हाईट हेड्स आणि काही बाबतीत सिस्टच्या रूपातही, ही समस्या पहावयास मिळत असते.

अॅक्नेचे अनेक प्रकार पहावयास मिळतात. व्हाईट हेड्स हे एक प्रकारचे अॅक्ने असून त्वचेवर जमा होणाऱ्या मृत पेशी, आणि त्वचेवरील बंद झालेली रंध्रे यामुळे व्हाईट हेड्स उत्पन्न होतात. हे व्हाईट हेड्स त्वचेवरील तेलकट भागांवर अधिक पहावयास मिळतात. व्हाईट हेड्स प्रमाणे ब्लॅक हेड्सही एक प्रकारचे अॅक्ने असून त्वचेवरील सीबम आणि बॅक्टेरिया यांच्यामुळे ब्लॅक हेड्स उद्भवतात. पॅप्युल्स नामक अॅक्नेचा आणखी एक प्रकार असून त्यामध्ये चेहऱ्यावर लालसर पुटकुळ्या उद्भवतात. या पुटकुळ्या काहीशा दुखरऱ्या असून, बहुतेकवेळी एखाद्या अॅलर्जीमुळे किंवा एक्झिमा सारख्या त्वचेच्या विकारांमुळे उद्भवतात. ‘पुस्ट्यूल्स’ हा ही अॅक्नेचा प्रकार असून, यामध्ये पुटकुळ्या जंतूंच्या मुळे संक्रमित झाल्याने त्यामध्ये ‘पस’ भरू लागतो. यावर जर वेळीच उपचार केले नाहीत, तर या पुटकुळ्यांमुळे चेहऱ्यावर कायमस्वरूपी डाग पडू शकतात. अॅक्नेचे सर्वात गंभीर स्वरूप सिस्टच्या रूपात पहावयास मिळते. यामध्ये त्वचेवर पुटकुळी येऊन त्यावर झालेले संक्रमण त्वचेच्या आतील सर्वात खालच्या थरापर्यंत पोहोचते. यासाठी तातडीने उपचार करण्याची आवश्यकता असते.

अॅक्ने उद्भवण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्वचेमध्ये असलेल्या तैलीय ग्रंथी सीबम तयार करीत असतात. या सीबमचे प्रमाण वाढले, तर त्वचेवर अॅक्ने उद्भवू शकते. त्याचप्रमाणे हार्मोन्सचे असंतुलन, त्वचेसाठी अयोग्य आणि असुरक्षित, ‘ऑईल बेस्ड’ प्रसाधनांचा अतिवापर, महिलांच्या मासिक धर्माच्या दिवसांमध्ये, तसेच अतीव मानसिक तणावामुळे, तेलकट पदार्थांचे प्रमाण आहारामध्ये अधिक असल्यानेही अॅक्ने उद्भवू शकतात. अॅक्नेची समस्या हाताबाहेर जाण्यापूर्वीच त्यासाठी काही घरगुती उपायांचा अवलंब करता येऊ शकेल. दररोज ‘स्क्रबर’चा वापर करून त्वचा ‘स्क्रब’ केल्याने अॅक्ने कमी होईल असा सर्वसाधारण समज आढळून येतो. मात्र हा समज चुकीचा आहे. त्वचा वारंवार स्क्रब केल्याने त्वचेशी निगडित समस्या वाढण्याची शक्यता असते. त्वचेवरील मृत पेशी स्क्रब द्वारे हटविणे योग्य असले तरी दररोज याचा वापर न करता आठवड्यातून केवळ दोन वेळा केला जावा.

त्वचेसाठी क्रीम्स, लोशन्स, किंवा मेकअप साठी प्रसाधने निवडताना या प्रसाधनांमध्ये कोणकोणती रसायने वापरली गेली आहेत हे काळजीपूर्वक वाचून पाहावे. प्रसाधनांच्या लेबल्सवर ही माहिती दिलेली असते. ही माहिती काळजीपूर्वक वाचून प्रसाधानांमध्ये वापरले गेलेले पदार्थ आपल्या त्वचेसाठी सुरक्षित आहेत याची खात्री करून घेऊनच प्रसाधने वापरली जावीत. चेहऱ्यावर मुरुमे किंवा पुटकुळ्या आल्याच, तर त्या नखांनी फोडणे टाळावे. जर या पुटकुळ्या फोडल्या, तर त्यामुळे चेहऱ्यावर कायमस्वरूपी डाग निर्माण होण्याची शक्यता असते. चेहऱ्यावर अॅक्ने असल्यास दिवसातून किमान दोन वेळा चेहरा सध्या पाण्याने स्वच्छ धुवावा. चेहरा पुसण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करावा. आपण झोपण्यासाठी वापरत असलेल्या उशीचा अभ्रा वेळोवेळी स्वच्छ धुवावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment