आता तर चक्क कोथळा काढायची भाषा वापरली जाते– शरद पवार


मुंबई – आज मृणालताई गोरे दालनाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. उद्योगमंत्री सुभाष देसाई हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून व अध्यक्षस्थानी बाबा आढाव यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन केशव गोरे स्मारक ट्रस्टच्यावीतने करण्यात आले होते. या कार्यक्रमपत्रिकेवर ”मृणालताई गोरे दालन, संघर्षाचा कलात्मक अविष्कार” असे नमूद करण्यात आले होते.

शरद पवार यांनी या कार्यक्रमात बोलताना मृणालताई गोरे यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात अनेकांनी प्रचंड योगदान दिले. त्या अनेकांपैकी काहींची आठवण ही प्रकर्षाने आपल्या सगळ्यांना होते, मृणालताईंचे नाव त्यात आल्याशिवाय राहणार नसल्याचे शरद पवार म्हणाले.


तसेच, जेव्हा सदनात मृणालताई गोरे असायच्या तेव्हा अनेकदा वाद व्हायचे पण ते राज्याच्या हिताचे असायचे. त्याकाळी सुसंवाद पाहायला मिळायचा, तो सुसंवाद आज पाहायला मिळत नाही. आता कोथळा काढायची भाषा वापरली जाते, असे देखील शरद पवारांनी यावेळी बोलून दाखवले.


यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, मृणालताईंचे एक दालन आज सुरू होत आहे ही खरोखरच आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. मृणालताई गोरे कोण होत्या, त्यांचे काय कार्य होते, याची नाही म्हटले तरी थोडीशी झलक या दालनात बघायला मिळेल. खरंतर अशा एका दालनात मृणालताईंचे सगळे जीवन मांडणे कठीण आणि मोठे आव्हान आहे. आकाशात कडाडणाऱ्या वीजेला हातात पकडण्यासारखे ते आहे, पण या सर्वांनी हा प्रयत्न केला. मृणालताईंची कामाची पद्धत अतिशय वेगळी होती. त्यांच्या कामाचा प्रभाव त्या काळातील सर्व विचारसरणीच्या कार्यकर्त्यांवर पडतच होता. म्हणून कळत न कळत कार्यकर्त्यांची एक पिढी नक्कीच मृणालताईंच्या सावलीत वाढली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न हाती घेतले. निवारा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, निराधार महिलांचे प्रश्न हाती घेतले. अशा अनेक विषयांना त्यांनी हात घातला. केवळ रस्त्यावर उतरून चळवळ करणे एवढ्यापुरते त्यांचे कार्य मर्यादित नव्हते. तर रचनात्मक काम काहीतरी कार्य उभे करावे, हे देखील त्या करायच्या.

औरंगाबादमध्ये आजी, माजी व भावी सहकाऱ्यांबद्दल मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावर सुभाष देसाई यांची प्रतिक्रिया
तर, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये आजी, माजी व भावी सहकाऱ्यांबद्दलच्या केलेल्या विधानावर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री बोलल्यानंतर चर्चा होणारच आणि चर्चा झाली तर वावग नाही. आमच्याबरोबर जे येतात, ते सहकारीच होतात. आता त्यात त्यांना अभिप्रेत काय आहे, हे मुख्यमंत्रीच सांगू शकतील. त्यातून आणखी अर्थ शोधण्याची गरज नाही. जे विकृत रूप आजकालच्या राजकारणाला येत जात आहे, त्यातून त्यांनी एक उपाययोजना सुचवली आहे, समान उद्दिष्टासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. पण, मला नाही वाटत की एकत्र येऊ, राजकीय नाहीच. तो विषयच नाही. राज्यसरकार ५ वर्षांचा कालावधी पूर्ण करणार, असे सुभाष देसाईंनी बोलून दाखवले.