मुंबई महानगरपालिकेने जारी केल्या गणेश विसर्जनासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी


मुंबई : बृह्नमुंबई महानगरपालिका उद्या होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी सज्ज झाली असून कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यंदाही कोरोनाच्या परिस्थितीत वैभवशाली गणपती विसर्जन मिरवणूक होणार नाही. यासाठी मुंबई महानगरपालिकेने गणेश विसर्जनासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

  1. हार / फुले इ. चा सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनी कमीत-कमी वापर करुन कमीत-कमी निर्माल्य तयार होईल, याची दक्षता घ्‍यावी. तसेच गणेशोत्सव घरगुती स्वरुपात साजरा करणा-यांनी देखील याबाबतची दक्षता घ्यावी.
  2. घरगुती गणेशाची मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या-घरी बादलीत किंवा ड्रममध्‍ये करावे.
  3. घरच्या-घरी गणेशमूर्तींचे विसर्जन करणे शक्य नसल्यास जवळच्या कृत्रिम विसर्जन स्थळी मूर्तीचे विसर्जन करण्यात यावे. तसेच नजीकच्‍या कृत्रिम विसर्जन स्थळी सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनी देखील मूर्तीचे विसर्जन करण्‍यास प्राधान्‍य द्यावे.
  4. घरगुती गणेशोत्‍सवाच्‍या विसर्जनाच्या वेळी मिरवणुकीने जाऊ नये, विसर्जनासाठी जास्तीत-जास्त पाच व्‍यक्‍ती असाव्‍यात. या व्‍यक्तिंनी शक्‍यतो कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले असावेत व दुसरा डोस घेवून 15 दिवस झालेले असावेत.
  5. घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करताना संपूर्ण चाळीतील / इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी एकत्र जमू नये.
  6. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत-कमी वेळ थांबावे. मास्‍क / शिल्‍ड इ. स्‍वसंरक्षणाची साधने विसर्जन प्रसंगी काटेकोररित्‍या वापरण्‍यात यावी.
  7. सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी लहान मुले व वरिष्ठ नागरिकांनी जावू नये.
  8. 10 पेक्षा अधिक लोक सार्वजनिक गणेशमूर्तींच्‍या विसर्जनाच्‍यावेळी असणार नाहीत. जे उपस्थित असतील त्‍यांनी मास्‍क आणि सामाजिक अंतर बंधनकारक असेल.
  9. तसेच सदर 10 व्‍यक्तींनी देखील शक्‍यतो कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले असावेत आणि दुसरा डोस घेवून 15 दिवस झालेले असावेत. तसेच कोणत्‍याही प्रकारची विसर्जन मिरवणूक काढण्यात येवू नये.
  10. मंडपापासून विसर्जन स्‍थळापर्यंत मूर्ती असलेले वाहन मिरवणुकीसारखे अत्‍यंत धीम्‍या गतीने सार्वजनिक गणशोत्‍सव मंडळांनी नेवू नये, तर वाहनातील गणेशमूर्तीला इजा पोहोचणार नाही अशा सामान्‍य गतीने वाहन विसर्जन स्‍थळी घेवून जावे. विसर्जनादरम्‍यान वाहन थांबवून रस्‍त्‍यांवर भाविकांना गणेशमूर्तीचे दर्शन घेऊ देण्‍यास/पूजा करुन देण्‍यास सक्‍त मनाई आहे
  11. कोणत्‍याही मिरवणुकीस सन 2021 च्या गणेशोत्‍सवादरम्‍यान परवानगी नाही, याची देखील भाविकांनी नोंद घ्‍यावी.
  12. एकूण 73 नैसर्गिक विसर्जन स्‍थळे मुंबई शहरात आहेत. महानगरपालिकेद्वारे तेथे अतिरिक्‍त मनुष्‍यबळ देऊन मूर्ती संकलनाची शिस्‍तबद्ध व्‍यवस्‍था उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे. गणेशमूर्ती त्‍यांच्याकडे देण्‍यात यावी. नागरिकांनी किंवा सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांच्‍या कार्यकर्त्‍यांनी या नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर थेट पाण्‍यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्‍यास प्रतिबंध आहे.
  13. महापालिकेच्‍या 24 विभागांमध्‍ये नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवरील गर्दी कमी होण्‍यासाठी सुमारे 173 ठिकाणी कृत्रिम तलाव देखील निर्माण करण्‍यात आले आहेत. कृत्रिम तलावालगत राहणा-या भाविकांनी शक्‍यतो सदर कृत्रिम तलावाचा वापर करावा.
  14. काही गणेशमूर्ती संकलन केंद्रे महानगरपालिकेच्‍या काही विभागांतर्गत निर्माण करण्‍यात आली आहेत.
  15. मूर्ती संकलन केंद्रावर, कृत्रिम तलावांवर किंवा नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर उपलब्‍ध महापालिकेच्‍या व्‍यवस्‍थापनाकडे मूर्ती सूपूर्द करण्‍यापूर्वी मूर्तीची यथासांग पूजा व आरती घरीच किंवा मंडळाच्‍या मंडपातच करुन घेणे बंधनकारक आहे.
  16. विसर्जना दरम्‍यान सामाजिक दूरीकरण अंतर, मास्‍क/मुखपट्टी, सॅनिटायझर वापरणे इत्‍यादी संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
  17. मंडपातच प्रतिबंधित क्षेत्र मध्‍ये असणा-या सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळाच्‍या मूर्तीचे विसर्जन करावयाचे आहे किंवा विसर्जन पुढे ढकलावयाचे आहे. सील्‍ड इमारतींमधील गणेशमूर्तीच्‍या विसर्जनासाठी घरीच व्‍यवस्‍था करावयाची आहे, याची कृपया नोंद घ्‍यावी.
  18. घर / इमारत गणेशोत्सव कालावधीत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्यास प्रतिबंधित क्षेत्र नियमांचे पालन करण्यात यावे.
  19. भाविकांकडून बृहन्‍मुंबई महानगरपालिका/पोलिस प्रशासन यांनी घालून दिलेल्‍या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्‍यात यावे.
  20. अशी कोणतीही कृती उत्सव प्रसंगी करु नये, जेणेकरुन कोरोनाचा प्रादुर्भाव होईल. अन्यथा अशी व्यक्ती कारवाईस पात्र ठरेल.
  21. सर्व विसर्जनस्‍थळी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने सर्व ती व्‍यवस्‍था केली असून मुंबईकर गणेशभक्‍त नागरिकांनी कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वतोपरी काळजी घेऊन श्रीगणरायाला भावपूर्ण निरोप द्यावा, असे आवाहनही महानगरपालिका प्रशासनाद्वारे पुन्हा एकदा करण्यात येत आहे.