दहशतवाद्यांच्या निशाण्यावर मुंबई लोकल; गुप्तचर खात्याचा इशारा


मुंबई : दिल्लीत सहा दहशतवाद्यांना चार दिवसांपूर्वी अटक केल्यानंतर मुंबईमध्ये काल आणखी एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. मुंबई लोकल या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती पुढे आली आहे. अशातच मुंबई लोकलमध्ये विषारी गॅसच्या सहाय्याने हल्ला करण्याची योजना दहशतवाद्यांनी आखल्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिल्यामुळे मुंबई लोकल स्थानकांवरच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

रेल्वे पोलिसांना तशी माहिती गुप्तचर विभागाने दिल्याचे वृत्त आहे. रेल्वे पोलिसांनी या इशाऱ्यानंतर स्थानकावरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली असून प्रत्येक गोष्टीची तपासणी केली जात आहे. काही महत्वाच्या रेल्वे स्थानकावरील एन्ट्री आणि एक्झिटच्या मुख्य मार्गाव्यतिरिक्त इतर सर्व रस्ते बंद केले आहेत.

पुन्हा एकदा मुंबई लोकलवर निशाणा साधण्याचा कट दहशतवाद्यांनी रचला होता. मुंबई लोकलची त्यांनी रेकी केली होती. मुंबई लोकल यापूर्वी अनेकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आली आहे. यापूर्वी मुंबई लोकलमध्ये सीरिअल बॉम्बस्फोट झाले आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांचा मुंबई लोकलची रेकी करण्यामागे नक्की काय हेतू होता? याबाबत तपासयंत्रणा आणखी तपास करत आहेत.

सहा दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी दोघांनी पाकिस्तानात प्रशिक्षण घेत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे, तर उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून चौघांना अटक करण्यात आली आहे.

या दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. स्पेशल सेलला माहिती मिळाली होती की पाकिस्तान समर्थित दहशतवादी गट दिल्ली आणि जवळपासच्या भागात स्फोट घडवण्याचा कट आखत आहेत आणि त्यांचे लक्ष्य गर्दीची ठिकाणे आहेत.