देशभरातील सहा हजार ब्लॉकमध्ये आता ATM मधून मिळणार औषधे


नवी दिल्ली : सुट्टीच्या दिवशी म्हणा अथवा बँक कर्मचारी संपाच्या दरम्यान बँका जरी बंद असल्या तरी देखील आपण एटीएमच्या माध्यमातून कुठेही आणि कधीही बँकेसंदर्भातील व्यवहार करु शकतो. आता औषधांच्या बाबतीतही अशाच प्रकारची व्यवस्था सुरु होणार असून यापुढे आता एटीएममधून औषधे मिळणार आहेत. देशभरातील प्रत्येक ब्लॉकमध्ये औषधांचे हे ATM मशीन बसवण्यात येणार असल्यामुळे दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना आता 24 तास ओषधे उपलब्ध होणार आहेत.

देशभरातील एकूण सहा हजार ब्लॉकमध्ये असे औषधांचे मशीन बसवण्यात येणार आहे. डॉक्टरांनी दिलेली प्रिस्क्रिप्शनची चिठ्ठी या मशीनमध्ये टाकल्यानंतर ही औषधे उपलब्ध होऊ शकणार आहेत. केंद्र सरकारच्या कॉमन सर्व्हिस सेंटर आणि आंध्र प्रदेशमधील ATMZ या संस्थेमध्ये अशा प्रकारचा करार झाला आहे.

या आधीपासूनच केंद्र सरकारच्या कॉमन सर्व्हिस सेंटरच्या मार्फत ब्लॉक स्तरावर अयूर संजिवनी केंद्र सुरु आहेत. आता ही औषधांची एटीएम या केंद्रावर बसवण्याच्या निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. गर्भधारणा, कोरोना तपासणी, ऑपरेशन संबंधी औषधे आणि इतर अनेक वैद्यकीय उपकरणे आणि इतर प्रकारची औषधे या एटीएममधून मिळणार आहेत. तसेच कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून ग्रामीण उद्योजकांना पुढील महिन्यापासून या संदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

शक्यतो जेनेरिक औषधे ब्लॉक स्तरावर बसवण्यात येणाऱ्या या एटीएममधून ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. ई-कॉमर्स कंपन्यांकडून या एटीएमना औषधांचा पुरवठा केला जाणार आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना डोळ्यासमोर ठेऊन अशा प्रकारची व्यवस्था ही सुरु करण्यात येत असल्यामुळे आता नागरिकांना पैशाप्रमाणे औषधे देखील 24 तास उपलब्ध होणार आहेत.