करोना लसीकरण, चीनला पछाडून भारताचे जागतिक रेकॉर्ड

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी भारताने नवे जागतिक रेकॉर्ड नोंदवून जगात देशाची प्रतिमा उंचावण्याची कामगिरी बजावली आहे. १७ सप्टेंबरच्या एका दिवसात देशात २ कोटी ३७ लाखहून अधिक नागरिकांना कोविड १९ लसीचा डोस देण्यात आला असून ही संख्या ऑस्ट्रेलियाच्या एकूण लोकसंखेपेक्षा जास्त आहे. आत्तापर्यंत एका दिवसात सर्वाधिक लसीकरण करण्याचा विक्रम चीनच्या नावावर होता. चीनला पछाडून भारताने नवा विक्रम नोंदविला आहे.

चीन मध्ये २८ जून रोजी एका दिवसात २ कोटी २४ लाख नागरिकांना करोना लस दिली गेल्याचे जाहीर करण्यात आले होते. भारतात १७ सप्टेंबरला हा आकडा रात्री नऊ पर्यंतच ओलांडला गेला. भारतात आत्तापर्यंत ७८ कोटी नागरिकांचे लसीकरण झाले असून चीन याबाबत आपल्या पुढे म्हणजे २१० कोटींवर आहे. अर्थात चीनच्या या दाव्यावर कोणत्याच देशाने विश्वास दाखविलेला नाही असेही समजते. अमेरिकेत ३८ कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी भारताच्या या विक्रमाबदल मिठाई खिलवून आनंद व्यक्त केला. ते म्हणाले आपल्याकडे पुरेश्या प्रमाणात लस आहे आणि लसीकरणाचे हे आव्हान आपण सहज पार पाडू शकणार आहोत.