‘मराठवाडा मुक्ती संग्राम दिना’निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा


मुंबई : ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम’ हा मराठवाड्याच्या त्यागाचा, शौर्याचा, संघर्षाचा गौरवशाली इतिहास आहे. स्वामी रामानंदतीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांच्यासारख्या दिग्गज मान्यवरांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे महत्त्व देशाच्या स्वातंत्र्यलढ्याइतकंच आहे. देशाची एकता, अखंडता, सार्वभौमतेसाठी मराठवाडा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्या, त्याग केलेल्या वीर सुपुत्रांचा देश नेहमीच ऋणी राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील वीरांचे स्मरण करुन राज्यातील जनतेला मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘मराठवाडा मुक्ती संग्रामदिना’निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्यासह राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाडा मुक्तीसाठी लढलेल्या मराठवाड्यातील नागरिकांबद्दल, स्वातंत्र्यसैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. मराठवाड्याचा इतिहास संघर्षाचा राहिला आहे. हा संघर्षाचा वारसा कायम ठेवून भविष्यकाळात मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी ध्येय ठेवून आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करुया, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील जनतेला केले आहे.