भिडे गुरुजींची एकनाथ शिंदेंशी बंद खोलीत तासभर चर्चा


महाबळेश्वर – आज शिवसेनेचे नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी त्यांच्या दरे (ता.महाबळेश्वर) या गावी जाऊन भेट घेतली. खासदार उदयनराजेंनी काल बोटीतून जाऊन मंत्री शिंदे यांची भेट घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी भिडे गुरुजींनी भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

मराठा आरक्षण व सातारा शहरातील पालिकेच्या विविध विकासकामांसंदर्भात खासदार उदयनराजे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी भिडे गुरुजी यांनी भेट घेतल्यामुळे या दोन्ही भेटीतून काय घडणार का, याची चर्चा सुरु झाली आहे.

भिडे गुरुजी यांना याविषयी विचारले असता त्यांनी भेटीचे कारण सांगण्याचे टाळले. दोघांत सुमारे तासभर बंद खोलीत चर्चा झाली. या चर्चेत नेमके काय मुद्दे होते, याची उत्सुकता आता ताणली आहे. पण, ही सदिच्छा भेट असल्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. बंद खोलीतील चर्चेनंतर मंत्री शिंदे यांच्या शेतात संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते फणसाचे रोप लावण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.