गुजरातमध्ये रुपाणी मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांची हकालपट्टी; २४ नव्या मंत्र्यांचा शपथविधी डच्चू


गांधीनगर – गेल्या काही दिवसात गुजरातमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्रिपदाची भूपेंद्र पटेल यांनी शपथ घेतल्यानंतर आज २४ नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. विशेष म्हणजे भूपेंद्र पटेल मंत्रिमंडळात रुपाणी यांच्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याला स्थान देण्यात न आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. भूपेंद्र पटेल मंत्रिमंडळात एकूण २४ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात १० जणांना कॅबिनेट मंत्रिपद, तर १४ जणांना राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे.

आज दुपारी ४.३० वाजता गांधीनगर येथे नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक आयोजित केल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले होते. विधानसभा स्पीकरपदी निमा आचार्य यांची नियुक्ती झाली आहे. तर राजेंद्र त्रिवेदी यांनी पदाचा राजीनामा देत मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मंत्रिमंडळातील २२ मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यात माजी उप मुख्यमंत्री नितीन पटेल यांचाही समावेश असल्यामुळे पक्षातील अंतर्गत कहल समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कॅबिनेट मंत्री – राजेंद्र त्रिवेदी, जितेंद्र वघानी, ऋषिकेश पटेल, पूर्णश कुमार मोदी, राघव पटेल, उदय सिंह चव्हाण, मोहनलाल देसाई, किरीट राणा, गणेश पटेल, प्रदीप परमार

राज्यमंत्री – हर्ष सांघवी, जगदीश ईश्वर, बृजेश मेरजा, जीतू चौधरी, मनीषा वकील, मुकेश पटेल, निमिषा बेन, अरविंद रैयाणी, कुबेर ढिंडोर, कीर्ति वाघेला, गजेंद्र सिंह परमार, राघव मकवाणा, विनोद मरोडिया, देवा भाई मालव

बुधवारी दुपारी शपथविधी सोहळा होणार होता. पण नव्या मंत्रिमंडळाबाबत रुपाणी आणि माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल नाराज होते. त्यामुळे बुधवारी सकाळपासून रात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबते सुरु होती. त्यानंतर हायकमांडने नाराज नेत्यांची समजूत काढण्याची जबाबदारी रुपाणी यांच्यावर सोडली होती. आज शपथविधी सोहळा पाहता नाराज असलेल्यांना बाहेरचा दाखवण्यात आला आहे.