
मुंबई – माजी वनमंत्री संजय राठोड यांनी एका कार्यक्रमात नो बॉलवरच माझी विकेट गेली, अशी खंत व्यक्त केली. तसेच ते मीडिया ट्रायलचे शिकार झाले असल्याचेही त्यांनी अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवले. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून वृत्तपत्राच्या छापील बातमीवर अजूनही जनसामान्यांचा विश्वास असल्यामुळे ही विश्वासार्हता टिकून राहायला हवी, असेही ते म्हणाले.
भर कार्यक्रमात आमदार संजय राठोडांनी नो बॉलवरच माझी विकेट गेल्याचे म्हणत व्यक्त केली खंत
वनमंत्री संजय राठोड बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर अडचणीत आले होते. सोशल मीडियात पूजा चव्हाणसोबतचे फोटो आणि या प्रकरणाशी संबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपकडून थेट संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यात आला होता. तर पोहरादेवी येथे माध्यमांशी बोलताना चौकशीतून सगळे समोर येईल. आपली बदनामी केली जात असल्याचाही आरोपही राठोड यांनी केला होता. पण, अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर असताना भाजप नेत्यांनी राठोडांचा राजीनामा घेऊन कारवाई करण्याची मागणी केली होती.
संजय राठोड यांनी त्यानंतर राजीनामा दिला होता. आता परत मला मंत्रीपद द्यायचे की नाही हा संपूर्ण निर्णय माननीय मुख्यमंत्री साहेबांचा आहे, पण माझ्या समाजासाठी मी काम करत राहणार असल्याचे माजी मंत्री संजय राठोड राजीनामा देताना म्हणाले होते.
