राज्य सरकारकडून साकीनाका बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांसाठी २० लाखांची मदत जाहीर


मुंबई – गेल्या आठवड्यात साकीनाका परिसरात गणेशोत्सवाच्या वातावरणात मुंबईसह राज्याला सुन्न करणारी घटना घडली. टेम्पोचालकाने एका ३४ वर्षीय महिलेवर अमानुष लैंगिक अत्याचार केले. उपचारांदरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अंधेरी साकीनाका परिसरात राहणारा आरोपी मोहन चौहान याने पीडितेवर केलेल्या लैंगिक अत्याचारांमुळे संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी यासंदर्भात दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत या प्रकरणातील तपासाबाबत माहिती दिली आहे.

विशिष्ट समाजाची पीडित महिला ही असल्यामुळे अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने तपास सुरु आहे. आरोपीने आपला गुन्हा कबुल केला आहे आणि त्याने गुन्हाच्या संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. घटनास्थळावर गुन्हा कसा घडला या घटनाक्रमातून सर्व पुरावे मिळाले आहेत. आरोपीकडून गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले हत्यार सुद्धा जप्त करण्यात आल्याचे हेमंत नगराळे यांनी सांगितले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे. सोमवारी मुख्यमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांसोबत वर्षा निवासस्थानी बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी पीडित महिलेच्या कुटुंबियांसाठी शासकीय योजना लागू केल्या आहेत. मुख्यमंत्री निधीतून आणि शासकीय योजनांमधून पीडितेच्या मुलींना २० लाखांची मदत जाहीर करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने साकीनाका येथे महिलेवर बलात्कार होऊन त्यानंतर तिच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी सुरु केलेल्या तपासावर समाधान व्यक्त केले. याप्रकरणी राज्य शासन संपूर्ण न्याय देईल असा विश्वास व्यक्त करताना, आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनी या घटनेत राजकारण आणता कामा नये, असे देखील स्पष्ट केले. मुख्यमंत्री राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांना या घटनेच्या अनुषंगाने स्वत: चर्चेसाठी बोलावून या घटनेकडे राज्य शासन गांभिर्याने पहात असून पीडितेच्या कुटूंबास योग्य तो मोबदला देण्यात येवून तिच्या मुलांच्या पालन पोषणाची जबाबदारी देखील पार पाडण्यात येईल, असे उध्दव ठाकरे यांनी आयोगास सांगितले.