मुख्यमंत्र्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी रायगड पोलिसांसमोर जबाब नोंदवणार राणे


रायगड – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपासंदर्भात जामीनावर असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे आज अलिबागमधील रायगड जिल्ह्यातील पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयात हजेरी लावणार आहे. सध्या मुंबईमधील जुहू येथील निवासस्थानी नारायण राणे हे असून पावणेबाराच्या सुमारास ते अलिबागच्या दिशेने रवाना झाले आहेत. दुपारी एक वाजेपर्यंत ते अलिबागमध्ये पोहणार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणासंदर्भात राणे यांचा जबाब आजच नोंदवून घेतला जाणार आहे.

आज सकाळी नारायण राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी राणेंच्या जुहू येथील निवासस्थानी त्यांची भेट घेतल्यानंतर यासंदर्भातील माहिती दिली. महाड प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी अटक झाल्याच्या दिवशीच राणे यांना रात्री जामीन मंजूर करताना महिन्यात दोनवेळा पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयात हजेरी लावण्याची अट घातली होती. पण नारायण राणे मागील वेळेस यांनी प्रकृतीचे कारण देत हजेरी लावली नव्हती. नारायण राणे अटक आणि सुटका प्रकरणानंतर आज पहिल्यांदाच पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयामध्ये हजेरी लावणार आहेत. दरम्यान राणे यांचा जामीन आजच या प्रकरणासंदर्भात नोंदवला जणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आज अलिबागमध्ये नारायण राणे येणार असल्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.