टप्पूसोबतच्या रिलेशनशिपच्या अफवांवर मुनमुन दत्ताची संतप्त प्रतिक्रिया


सध्या सोशल मीडियावर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये बबिता ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता आणि टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकत हे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. मुनमुन दत्ताने आता त्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. स्त्रियांना आपल्या विनोदामुळे सातत्याने शरमेने मान खाली घालावी लागते, मला आज भारताची लेक असल्याची लाज वाटत असल्याचा संताप मुनमुन दत्ता हिने व्यक्त केला आहे.


यासंदर्भात दोन पोस्ट मुनमुन दत्ताने शेअर केल्या आहेत. अशा प्रकारच्या बातम्या देणाऱ्या माध्यमांना एका पोस्टमध्ये तिने उपदेशाचा डोस दिला आहे. ती आपल्या पोस्टमध्ये म्हणते की, बातम्यांच्या नावाखाली आपल्या कल्पित कथांची राळ उडवत कोणत्याही व्यक्तीच्या खासगी आयुष्यात, तिच्या समंतीशिवाय डोकावण्याचा हक्क तुम्हाला कुणी दिला? नुकतेच आपले प्रेम एखाद्या स्त्रीने गमावले किंवा आपला मुलगा गमावला, तुम्ही तिच्या चेहऱ्यावरून कॅमेराही हटवत नाही, हे केवळ टीआरपीसाठी. हव्या तशा बातम्या तुम्ही देता आणि एखाद्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवता. अशा प्रकारे एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त केल्यानंतर तुम्ही या सगळ्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि तुम्ही जर ते करू शकत नसाल, तर तुम्हाला स्वत: ची लाज वाटली पाहिजे.


मुनमुन दत्ता आपल्या दुसऱ्या पोस्टमध्ये म्हणते, आपल्याकडून मला चांगल्या अपेक्षा होत्या. मात्र, कमेंट सेक्शनमधील लोकांच्या अश्लील कमेंट पाहिल्यानंतर, म्हणजे सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या लोकांनीही अशा प्रकारच्या कमेंट केल्यानंतर आपला समाज कसा मागे वाटचाल करत आहे, हे लक्षात येते. प्रत्येकाकडून आपापल्या कुवतीनुसार स्त्रीवर सातत्याने तिच्या वयावरुन आणि इतर गोष्टीवरुन कमेंट केल्या जातात. आपल्या कमेंटवरुन एखाद्याला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते याची चिंता कुणालाच नाही. अवघ्या 13 मिनिटात एखाद्याचे 13 वर्षाचे करियर धुळीस मिळवले जात असल्यामुळे एखादा व्यक्ती नैराश्यात गेला किंवा आपले जीवन संपवण्याचा विचार करत असेल, तर तुम्ही थोडे थांबा आणि विचार करा की आपल्यामुळेच ही परिस्थिती ओढावली असेल का. मला आज भारताची लेक म्हणून घ्यायची लाज वाटत आहे.