आज अमित शहा, शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत भूपेंद्र पटेल घेणार गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ


अहमदाबाद : भूपेंद्र पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली असून भूपेंद्र पटेल आज दुपारी 2.20 मिनिटांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यानंतर दोन दिवसांनी कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी पार पडेल. या शपथविधी समारंभासाठी गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी 12.30 मिनिटांनी ते अहमदाबादमध्ये पोहोचणार आहेत. याव्यतिरिक्त मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानही या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसाठी नितीन पटेल, मनसुख मांडवीया आणि पुरुषोत्तम रुपाला या तीन नेत्यांची नाव सर्वाधिक चर्चेत होती. पण भाजपने नेहमीप्रमाणे पुन्हा आश्चर्यचा धक्का देत मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांच्या हाती गुजरातची कमान दिली.

भाजपची एक महत्त्वाची बैठक रविवारी पार पडली. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांच्या नावावर याच बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. अनेक मोठमोठ्या नेत्यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत चर्चेत होती. पण एका नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय भाजपने घेतला आणि पाटीदार समाजातून येणाऱ्या भूपेंद्र पटेल यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपावली.

पाटीदार समाजातून भूपेंद्र पटेल येतात. ते विजय रुपाणी सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. यासह, भूपेंद्र पटेल दीर्घ काळापासून संघाशी संबंधित आहेत. त्यांची पटेल समाजातही चांगली पकड आहे. त्याचबरोबर 2017 च्या निवडणुकीत त्यांनी चांगल्या मतांनी विजय मिळवला होता. भूपेंद्र पटेल विधानसभा निवडणूक 1 लाख 17 हजार मतांनी जिंकले होते. भूपेंद्र पटेल हे गुजरातच्या घाटलोडिया विधानसभेचे आमदार आहेत. यापूर्वी भूपेंद्र पटेल अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष होते. भुपेंद्र पटेल यांनी अहमदाबाद महानगरपालिकेच्या (एएमसी) स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.

भाजपने केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि प्रल्हाद जोशी यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून गुजरातचे नवे मुख्यमंत्री निवडण्यासाठी नियुक्ती केली. दोन्ही नेते गांधीनगरमधील भाजप कार्यालय श्री कमलम येथे पोहोचले होते. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भूपेंद्र पटेल यांच्या नावावर सहमती झाली. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी भूपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा केली होती.