अनेक तळघरे आणि गुप्त वाटांचा भुलभुलैय्या – शेरगढ फोर्ट.


भारतामध्ये अनेक किल्ले असे आहेत, ज्यांच्याशी निगडित रहस्यांची उकल आजवर कोणीच करू शकलेले नाही. बिहार राज्याच्या रोहतास जिल्ह्यामध्ये उभा असलेला शेरगढ फोर्ट याचेच उदाहरण म्हणता येऊ शकेल. अफगाण शासक शेरशाह सुरीने बनवविलेल्या या किल्ल्यामध्ये अनेक भुयारे, गुप्त वाटा आहेत. या वाटा कुठे जातात, पुढे कुठे खुल्या होतात, गुप्त भुयारे कुठे घेऊन जाणारी आहेत, याचा खुलासा आजतागायत होऊ शकलेला नाही. अशी अनेक भुयारे आणि गुप्त वाटा या किल्ल्यामध्ये आहेत. रोहतास जिल्ह्यातील कैमुर डोंगरांवर उभ्या असलेल्या या किल्ल्याची बनावट इतर किल्ल्यांच्या मानाने पुष्कळ हटके म्हणावी लागेल. बाहेरून पाहताना येथे एखादा किल्ला असावा याची पुसटशी कल्पना देखील पाहणाऱ्याला येत नाही. हा किल्ला तीन बाजूंनी घनदाट अरण्यांनी घेरलेला असून, चौथ्या बाजूला दुर्गावती नदी वाहते. हा किल्ला सहजासहजी दृष्टीस पडणारा नसून किल्ल्याच्या आत जाण्याची वाट देखील एका भुयारातून जाते.

या किल्ल्यामधे ज्याप्रमाणे अनेक गुप्त वाटा आणि भुयारे आहेत, त्याप्रमाणे अनेक तळघरे देखील आहेत. एका वेळी हजारो लोक एकत्र बसू शकतील इतकी मोठी तळघरे या किल्ल्यामध्ये असल्याचे ही म्हटले जाते. शत्रूच्या हल्ल्यांपासून स्वतःचा आणि स्वतःच्या सैन्याचा बचाव करता यावा यासाठी शेरशाह सुरीने या किल्ल्याचे निर्माण करविले होते. तो स्वतः या किल्ल्यामध्ये आपल्या परिवारासह आणि समस्त सैन्यासह वास्तव्यास होता. सर्वांना राहण्यासाठी या किल्ल्यामध्ये त्या काळी सर्व प्रकारच्या सुविधा देखील उपलब्ध करविल्या गेल्या होत्या. किल्ल्यावरून पाहिले तर आसपासचा दहा किलोमीटरचा परिसर सहज दृष्टीक्षेपात येईल अश्या पद्धतीने या किल्ल्याची रचना करण्यात आली होती. याच किल्ल्यामध्ये शेरशाह सुरी वास्तव्यास असताना मुघल सैन्याने केलेल्या आक्रमणामध्ये शेरशाह आणि त्याच्या परिवारासह त्याचे सैन्यही मारले गेले होते.

१५४० ते १५४७ या काळामध्ये या किल्ल्याचे निर्माण झाले असून जर शत्रूने हल्ला केला, तर सुरक्षित रित्या किल्ल्यातून बाहेर पडता येण्याच्या दृष्टीने, आणि किल्ल्यामध्ये वास्तव्यास असलेल्या सैन्यासाठी पुरेशी रसद आणि शस्त्रास्त्रे साठविण्यासाठी या किल्ल्यामध्ये अनेक भुयारे आणि तळघरे बनविण्यात आली होती. या भुयारांची आणि तळघरांची सविस्तर माहिती केवळ शेरशाह आणि त्याच्या काही विश्वासू मंडळींनाच होती. या किल्ल्यातील एक भुयार रोहतास गढ कडे जाणारे असून बाकी गुप्त वाटा कुठल्या दिशेला आणि कुठवर जातात हे रहस्य मात्र अद्यापही कायम आहे. याच भुयारांमध्ये आणि तळघरांमध्ये कुठे तरी शेरशाह सुरीचा मौल्यवान खजिना देखील लपविला गेला असल्याचे म्हटले जाते. मात्र आजवर या खजिन्याचा देखील कोणताच सुगावा कोणालाही लागलेला नाही.

Leave a Comment