अश्या अजब ठिकाणी देखील मनुष्यांचे वास्तव्य !


जगामध्ये अश्या अनेक दुर्गम जागा आहेत जिथे राहणे तर सोडाच, तिथे पोहोचणे देखील मुश्कील आहे. मात्र अश्या ठिकाणी घर बनवून त्या ठिकाणी कायमस्वरूपी वास्तव्य करणारी धाडसी मंडळी देखील अस्तित्वात आहेत. या ठिकाणी येणे जाणे सोपे खचितच नाही, येथे कसल्या सोयी, सुविधा नाहीत, कोणाचा शेजारही नाही, तरीही मंडळी या घरांमध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करत मोठ्या आनंदाने येथे रहात आहेत. याचे उदाहरण आहे, ग्रेट ब्रिटनच्या ‘सफोक’ येतील सागरी किनाऱ्यापासून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘सीलँड’ येथे बनेलेल्या ‘सी फोर्ट’चे. एका मोठ्या पुलाप्रमाणे दिसणाऱ्या इमारतीवर ही घरे उभी आहेत. एकूण सत्तावीस लोक या घरांमध्ये राहत असून, सीलँडला जगातील सर्वात लहान राष्ट्र, म्हणजेच ‘मायक्रो नेशन’ असल्याचा दर्जा दिला गेला असून, त्यावरील ही रहिवासी इमारत ‘फोर्ट रफ्स’ या नावाने ओळखण्यात येते.

टर्की या देशामध्ये मध्यवर्ती प्राचीन अनाटोलीया प्रांतामध्ये असणारे कॅपाडॉकिया हे ठिकाण मानवी वसाहत विकसित झालेल्या सर्वात प्राचीन स्थळांपैकी एक म्हणता येईल. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकापासून या ठिकाणी मानवी वसाहत विकसित झाली आणि अनेक शासनकर्त्यांच्या काळामध्ये संपन्न होत गेली. या ठिकाणाला युनेस्कोने वर्ल्ड हेरीटेज साईटचा दर्जा दिला आहे. ही संपूर्ण वसाहत डोंगरी भागांमध्ये असून ज्वालामुखींच्या उद्रेकातून हे डोंगर तयार झाले असल्याचे म्हटले जाते. चारही बाजूंनी विशाल डोंगरांनी घेरलेले हे ठिकाण पुष्कळ उंचावर असून, या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये हवामान अतिशय उष्ण आणि कोरडे असते, तर हिवाळ्यामध्ये येथे बर्फवृष्टी होते. इटलीतील आर्नो नदीवर बनलेल्या ‘पॉन्टे वेकियो’ नामक पुलावर आजच्या काळामध्ये अनेक घरे आणि दुकाने पहावयास मिळतात. यातील काही घरे तर नदीच्या पाण्यावर आधांतरी बांधली गेल्याप्रमाणे भासतात. आर्नो नदीवर पायी नदी पार करण्यासाठी बांधण्यात आलेले दोन लहान पूल १३४५ सालापूर्वी पुरामध्ये नष्ट झाल्यानंतर ‘पॉन्टे वेकियो’ या पुलाची निर्मिती करण्यात आली. आता या पुलावर दुतर्फा घरे आणि दुकाने पहावयास मिळतात.

येमेन देशामध्ये हराज नामक डोंगरांवर वसलेल्या इमारतींच्या शहराला ‘अल हजराह’ या नावाने ओळखण्यात येते. हे शहर बाराव्या शतकामध्ये वसविण्यात आले असून, दुरून केवळ उंचच उंच भिंती या डोंगरावर असल्याचा भास होतो. वास्तविक या केवळ भिंती नसून अनेक मजली इमारती आहेत. या इमारतींचे अनेकदा नूतनीकरण करण्यात आले असून, या इमारतींमध्ये अनेक लोक आजही वास्तव्य करून आहेत. ग्रीस देशातील थेस्ले प्रांतामध्ये एक उंच कडा असून, या कड्याच्या टोकाशी ‘रॉसानोऊ मोनॅस्ट्री’ उभी आहे. १५४५ साली मॅक्सिमस आणि लोआस्फ नामक दोन भावांनी या मोनॅस्ट्रीचे निर्माण करविले असून, या मोनॅस्ट्रीच्या परिसरामध्ये एक चर्च, एक अतिथीगृह, एक सभागृह आणि येथे येणाऱ्यांना राहण्यासाठी कक्ष आहेत. १८०० साली या इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी लाकडी पुलाचे निर्माण केले गेल्यानंतर या ठिकाणी पोहोचणे काहीसे सोपे झाले. त्या पूर्वी मात्र येथवर पोहोचण्यासाठी अतिशय दुर्गम वाटेने यावे लागत असे. १९८८ सालापसून या ठिकाणी ख्रिस्ती नन्सचे कायमस्वरूपी वास्तव्य आहे.

Leave a Comment