ही आहे दीडशे वर्षे जुने झाड पोखरून बनविलेली ‘ट्री लायब्ररी’


आपल्या या जगामध्ये आश्चर्यांची कमतरता नाही. मनुष्याने आपल्या बुद्धीचा आणि कल्पकेतेचा वापर करून आजवर अनेक अनोख्या वस्तूंची निर्मिती केली आहे. अमेरीकेतील आयडाहो राज्याचा रहिवासी असणाऱ्या एका शिल्पकार महिलेने तिच्या घराच्या बाहेर असलेला एक डेरेदार वृक्ष पोखरून एक लहानसे पुस्तकालय बनविले असून यामध्ये खास लहान मुलांना आवडतील अशी अनेक पुस्तके तिथे ठेवण्यात आली आहेत. या पुस्तकाचे नामकरण ‘लिटल फ्री लायब्ररी’ असे करण्यात आले असून, सुमारे दीडशे वर्षे जुन्या झाडाचे खोड पोखरून ही लायब्ररी बनविण्यात आली आहे.

हे पुस्तकालय बाहेरून पाहताच इतके भुरळ पाडणारे आहे, की कोणालाही येथे बसून पुस्तकांच्या दुनियेमध्ये हरवून जाण्याचा अगदी सहज मोह व्हावा. या पुस्तकालायाचे निर्माण करणाऱ्या शार्ले एमिटेज हावर्ड हिने हे पुस्तकालय तयार करण्यास आणि त्यातील पुस्तकांच्या संग्रहासाठी केवळ ऐंशी डॉलर्स खर्च आला असल्याचे म्हटले आहे. हावर्डने आपल्या परसदारी असणाऱ्या भल्या थोरल्या वृक्षाचे खोड पोखरून काढून ही लायब्ररी अतिशय रचनात्मक पद्धतीने बनविली आहे. हे झाड जुने झाले असून, कमकुवत होऊ लागले असल्याने हे झाड पाडण्याबद्द्ल विचार सुरु असता, याच झाडाला पोखरून त्यावर ही लायब्ररी बनविण्याची कल्पना हावर्डला सुचली. हावर्डच्या या अनोख्या कल्पनेला पुस्तकप्रेमी मंडळी आणि बच्चे कंपनीकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हावर्डने झाडाचे खोड पोखरून काढून त्यामध्ये एक लहानशी खोली तयार केली आहे. या कपाटवजा खोलीमध्ये दिवे असून, लायब्ररीच्या बाहेरही प्रकाशव्यवस्था केली गेली आहे. आपल्या या अनोख्या कल्पनेपासून प्रेरणा घेऊन इतर लोकही त्यांच्यापाशी उपलब्ध असलेल्या रिसोर्सेसचा वापर करून, आजच्या डिजिटल काळामध्ये लुप्त होत चाललेली पुस्तकवाचनाची आवड जतन करण्याचा प्रयत्न करतील अशी आशा हावर्डला वाटते.

Leave a Comment