असा आहे ‘केन्सिंग्टन पॅलेस’चा इतिहास


लंडन येतील केन्सिंग्टन पॅलेस येथे ब्रिटीश शाही खानदानाच्या अनेक पिढ्यांतील सदस्यांनी वास्तव्य केले असून, सध्या या ठिकाणी राणी एलिझाबेथचे नातू प्रिन्स विलियम, त्यांची पत्नी कॅथरीन मिडलटन त्यांच्या तीन अपत्यांसह वास्तव्य करीत आहेत. एके काळी याच राजनिवासामध्ये प्रिन्सेस डायना यांचेही वास्तव्य असे. या राजनिवासाची इमारत दोन मजली असून, याचे निर्माण चारशे चौदा वर्षांपूर्वी, १६०५ साली करण्यात आले होते. केन्सिंग्टन पॅलेसला पूर्वीच्या काळी नॉटिंगहॅम हाऊस या नावाने ओळखले जात असे. ब्रिटनचे राजे तिसरे विलियम आणि राणी मेरी यांनी हे निवासस्थान १६८९ साली खरेदी केले. राजे तिसरे विलियम यांना दम्याचा विकार असल्याने त्यांना थेम्स नदीच्या नजीक असलेल्या निवासस्थानी असलेले दमट हवामान मानवत नसे. त्यामुळे त्यांनी नॉटिंगहॅम हाऊस खरेदी केले. त्यानंतर शाही दाम्पत्याच्या गरजा लक्षात घेता या निवासस्थानामध्ये अनेक बदल करण्यात येऊन याचे नामकरण केन्सिंग्टन पॅलस असे करण्यात आले.

याच निवासस्थानामध्ये राणी व्हिक्टोरियाचा जन्म झाला. व्हिक्टोरियाचे बालपण याच राजवाड्यामध्ये गेले असून, तिची आणि तिचे भावी पती प्रिन्स अल्बर्ट यांची प्रथम भेटही याच वास्तूत झाली. कालांतराने व्हिक्टोरिया आणि प्रिन्स अल्बर्ट विवाहबद्ध झाले, आणि त्यांना नऊ अपत्ये झाली. राणी व्हिक्टोरियाच्या काळामध्ये केन्सिंग्टन पॅलेस मोडकळीला आले होते. मात्र राणीने संसदेकडून ठराव मंजूर करून घेत या निवासस्थानाच्या नूतनीकरणाला सुरुवात करविली. १९६०च्या दशकामध्ये राणी एलिझाबेथची धाकटी बहिण केन्सिंग्टन पॅलेस येथे वास्तव्यास होती. तिच्या वास्तव्याच्या दरम्यान या शाही राजनिवासाने अनेक शानदार मेजवान्या पाहिल्या.

१९८०-९०च्या दशकामध्ये प्रिन्सेस डायनाचे वास्तव्य केन्सिंग्टन पॅलेसमध्ये असून, प्रिन्स विलियम आणि प्रिन्स हॅरी यांचा बालपणीचा काळ प्रिन्सेस डायनाच्या देखरेखीखाली याच राजनिवासामध्ये गेला आहे. १९९७ साली प्रिन्सेस डायनाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर ब्रिटीश नागरिकांनी डायनाच्या स्मृतीप्रीत्यर्थ लाखो फुलांचे गुच्छ केन्सिंग्टन पॅलेसच्या प्रवेशद्वाराशी आणून ठेवले होते. आताच्या काळामध्ये केन्सिंग्टन पॅलेस येथील अपार्टमेंट 1 A राणी एलिझाबेथने प्रिन्स विलियम आणि त्यांची पत्नी केट यांना भेट दिले असून, या अपार्टमेंटमध्ये एकूण वीस कक्ष आहेत. एके काळी याच अपार्टमेंटमध्ये राणी एलिझाबेथ यांची बहिण प्रिन्सेस मार्गारेट यांचे वास्तव्य असे.

Leave a Comment