दंड भरावा लागण्यासाठी अशीही अजब कारणे !


कोणत्याही देशामध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांची सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन त्या त्या देशांमध्ये काही कायदे-नियम लागू करण्यात आले आहेत. या कायद्यांचा भंग झाल्यास संबंधित नागरिकांना शिक्षा देण्याचा अधिकार न्यायव्यवस्थेला आणि स्थानिक प्रशासनाला असून, शिक्षा म्हणून नागरिकांकडून दंडही वसूल केला जात असतो. कायदेभंग गंभीर स्वरूपाचा असला, तर दंडासोबत तुरुंगवासाची शिक्षा देखील सुनाविली जात असते.

मात्र इतिहासामध्ये काही घटना अश्या घडून गेल्या, ज्यामध्ये नागरिकांना ज्या गुन्ह्यासाठी दंड भरावे लागले, ते गुन्हे चमत्कारिक परिस्थिती उद्भवल्यामुळे, अनपेक्षित रित्या घडले. तरीही न्यायव्यवस्थेने संबंधित नागरिकांच्या प्रती कोणतीही अनुकंपा न दाखविता, कायद्याप्रमाणे त्यांना योग्य तो दंड ठोठविलाच. २७ सप्टेंबर १९०८ साली ‘वॉशिंग्टन इव्हनिंग स्टार’ या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार विलियम वेस्ट नामक एका पोलीस अधिकाऱ्याने अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती युलिसिस ग्रांट यांना वाहनाची वेगमर्यादा न पाळल्याने दंड केला होता. त्या संध्याकाळी राष्ट्रपती महोदय कधी नव्हे ते स्वतःहून घोडागाडी घेऊन निघाले असता, घोडागाडीचा वेग वेगमर्यादेपेक्षा अधिक असल्याने अधिकारी वेस्ट यांनी राष्ट्रपतींची घोडागाडी थांबवून त्यांना वेगमर्यादा ओलांडल्याबद्दल समज दिली.

राष्ट्रपतींनी माफी मागितल्यावर हे प्रकरण तात्पुरते मिटले खरे, पण त्याच्या पुढच्याच दिवशी राष्ट्रपती महोदयांना पुन्हा आपली घोडागाडी हाकत असताना वेगमर्यादा न पाळल्याबद्दल अधिकारी वेस्ट याने अटक केली. त्यावेळी खुद्द राष्ट्रपतींना वीस डॉलर्सचा दंड भरावा लागला असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

१९८२ साली लॉस एंजिलीस शहरामध्ये राहणाऱ्या लॉरेन्स रिचर्ड वॉल्टर्स या इसमाला मोठी अजब कल्पना सुचली. लहानपणापासून लॉरेन्सने वैमानिक बनून विमानांमध्ये भरारी घेण्याचे स्वप्न मनामध्ये जोपासले होते. मात्र तरुणपणी लॉरेन्सची दृष्टी कमकुवत झाली, आणि त्यामुळे वैमानिक बनण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. मात्र आपले हे स्वप्न कोणत्याही प्रकारे पूर्ण करायचेच हा निर्धार प्रत्यक्षात उतरविण्यासाठी लॉरेन्सने अजब मार्ग शोधून काढला.

त्याने आपल्या सोबत आवश्यक ते खाण्या-पिण्याचे सामान एका पिशवीत भरून घेतले आणि आपल्या घराच्या बागेमध्ये दोऱ्यांनी बांधलेल्या खुर्चीमध्ये तो विराजमान झाला. त्याच्या या खुर्चीला त्याने आधीच भरपूर प्रमाणात हिलीयमने भरलेले मोठाले फुगे बांधले होते, त्यामुळे खुर्ची आकाशामध्ये झेपावण्यास तयार होती. सर्व तयारी होताच लॉरेन्सने आपल्या खुर्चीला बांधलेले दोर कापले आणि त्याची खुर्ची उंच आकाशामध्ये झेपावली. आकाशातून प्रवास करीत असलेल्या दोन प्रवासी विमानांच्या वैमानिकांनी खुर्चीवर तरंगणारा हा मनुष्य पाहताच ग्राउन्ड कंट्रोलला या बद्दल सूचित केले. ग्राउंड कंट्रोलच्या वतीने याची सूचना त्वरित पोलिसांना दिली गेली.

तेवढ्यात लॉरेन्सची खुर्ची वीजवाहिनीमध्ये अडकून तिच्यात बिघाड झाला आणि सर्व परिसर अंधारात बुडाला. एव्हाना लॉरेन्सने एकामागून एक फुगे फोडण्यास सुरुवात केली असल्याने तो सुखरूप जमिनीवर उतरला. तो जमिनीवर अवतरताच पोलिसांनी त्याला अटक केली, आणि त्याला चार हजार डॉलर्सचा दंड ठोठाविण्यात आला. मात्र त्याच्यामुळे कोणाचे फारसे नुकसान झाले नसल्याने त्याच्या दंडाची रक्कम १५०० डॉलर्स करून न्यायालयाने त्याची मुक्तता केली. लॉरेन्सला त्याच्या या धाडसासाठी दंड करण्यात आला असला, तरी त्याच्या या कारनाम्याला भरपूर प्रसिद्ध मिळाली आणि तेव्हापासून ‘क्लस्टर बलूनिंग’ नामक अॅडव्हेन्चर स्पोर्टही अस्तिवात आले.

Leave a Comment