शरद पवारांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेवर नारायण राणे म्हणतात…


मुंबई – काँग्रेसवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केलेल्या टीकेची सध्या राज्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. काँग्रेसची तुलना शरद पवारांनी नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासोबत केल्यामुळे राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. आता शरद पवारांच्या वक्तव्यावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून हे सोयीचे राजकारण असून आदर्श राजकारणी म्हणणार नसल्याचे म्हणत टीका केली आहे.

‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस पक्षाविषयी आपली भूमिका मांडली आहे. शरद पवार यांनी यावेळी बोलताना जुनी जमीनदारी संपली असली, तरी उरलेला राजवाडा कसा सांभाळावा हे समजत नाही. काँग्रेसने आता स्वीकारावे की ते आता जमीनदार राहिलेले नसल्याचे म्हटले होते.

आपल्या नेतृत्वाबद्दल काँग्रेसची नेतेमंडळी वेगळी भूमिका घेण्याच्या मनस्थितीत नसतात. त्याबाबत एक उदाहरण पवारांनी सांगितले. उत्तर प्रदेशतील जमिनदारांकडे मोठी शेती आणि हवेलीही असायची. कमाल जमीन धारणा कायदा झाला आणि त्यांच्या जमिनी गेल्या. पण हवेली आहे, तशीच आहे. पण हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकद त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमीन आता १५-२० एकरावर आली. जमीनदार उठतो बाहेर जाऊन बघतो. त्याला पीक दिसते. तेव्हा तो हे सर्व हिरव पीक माझे होते, असे सांगतो. पण सध्या ते त्याचे नसते. तशी अवस्था काँग्रेसची झाली असल्याचे निरीक्षण पवारांनी नोंदविले.

दरम्यान नारायण राणे यांनी शरद पवार कधी काय बोलतील….एका बाजूला काँग्रेसवर टीका करायची आणि दुसरीकडे त्यांना सोबत घेऊन सरकार चालवायचे. हा प्रकार काय आदर्श राजकारणी म्हणणार नाही. हे सोयीचं राजकारण असल्याची टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या विधानाचा आधार घेऊन काँग्रेसचे यापेक्षा करेक्ट वर्णन दुसरे असूच शकत नाही. आत्ता काँग्रेस जुन्या पुण्याईवर जगत आहे. वऱ्हाडात असे म्हणतात की मालगुजरी तर गेली, पण उरलेल्या मालावर आता गुजराण सुरू आहे. तशा प्रकारचे वक्तव्य पवार साहेबांनी केले आणि ते काँग्रेसवर चपखलपणे लागू होते, अशा शब्दांत काँग्रेसला खोचक टोला लगावला.