जिल्ह्यातील भौगोलिक रचना व नदी-नाल्यांचे रुप पाहता कोकणाच्या धर्तीवर पायी चालण्यासाठी साकवाचा विचार करू


नांदेड : नैसर्गिक आपत्ती आणि पुरात होणारी जीवत हानी ही अनपेक्षित आणि तेवढीच दु:खद असते. कोणाच्या परिवारात झालेली जिवीत हानी कितीही मदत केली तरी ती भरुन काढता येणारी नाही. पालकमंत्री व शासनाचा एक घटक या नात्याने मी जिल्ह्यातील सर्व अतिवृष्टीग्रस्त लोकांच्या समवेत असून शासन पातळीवर जे काही शक्य आहे ती सारी मदत करण्यास आम्ही तत्पर असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.

भोकर तालुक्यातील डौर या गावातील पुरात वाहून मयत पावलेल्या लक्ष्मीबाई हनमंत चंदापुरे यांच्या परिवारातील सदस्यांची त्यांनी भेट घेऊन धीर दिला. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मयत लक्ष्मीबाई यांचे पती हनमंत चंदापुरे यांना शासनाच्यावतीने 4 लाख रुपयाचा मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

नांदेड जिल्ह्यातील भौगोलिक रचना, लहान-मोठ्या नदी-नाल्यांना पूर येऊन ग्रामीण भागात होणारी जिवीत हानी चिंताजनक आहे. अनेक खेड्यात पुरामुळे शेतात अडकून पडलेल्या लोकांना आपल्या घरी परतण्यासाठी नाल्यावरुन सुरक्षित मार्ग नसल्याची वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. घरी परतण्याच्या प्रयत्नात काही प्रसंगी लोक वाहून जातात. या आपत्तीत केवळ मानवी चुका म्हणून पाहून चालणार नाही, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

यातून मार्ग काढण्यासाठी कोकणाच्या धर्तीवर नाल्याच्या ठिकाणी पायी सुरक्षित चालण्यापुरते लोखंडी साकव तयार करता येतात का याची चाचपणी करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांना दिले. नांदेड येथे ठरावीक चौकात गर्दीतून लोकांना सुरक्षित जाता यावे या उद्देशाने उभारण्यात आलेल्या ओव्हर ब्रिजचा वापर नसल्याने हे लोखंडी ब्रिज जर अशा अपघात प्रवन क्षेत्रात हलवता येतील का याचीही चाचपणी करण्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज अर्धापूर तालुक्यातील शेलगाव, सांगवी खु., सावरगाव, भोकर तालुक्यातील डौर, सायाळ, सायखोड व इतर क्षेत्रातील पूरग्रस्त भागाची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे त्यांनी निर्देश दिले. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पुरात वाहून गेलेल्या व नैसर्गिक आपत्ती (वीज पडून) मृत पावलेल्या व्यक्तींच्या 20 कुटुंबांना शासनाच्यावतीने आर्थिक मदत करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.