
नवी दिल्ली : ऑक्टोबर महिन्यात सर्वसामान्यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. मुंबई त्याचप्रमाणे राजधानी दिल्लीमध्ये सीएनसी आणि पीएनजीचे दर 10 ते 11 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. असा अंदाज ब्रोकरेज कंपनी आयसीआयसीआय सिक्योरिटीजने व्यक्त केला आहे. अहवालात असे म्हटले आहे की, सुमारे 76 टक्के सरकारद्वारे निर्धारित गॅसच्या किमतीत वाढ होणार आहे, ज्याचा परिणाम सीएनजी आणि पीएनजीच्या किमतींवरही होईल. सरकार गॅस सरप्लसच्या देशांचे दर वापरते. सार्वजनिक क्षेत्रातील ओएनसीजीसारख्या कंपन्यांना नामांकनाच्या आधारावर देण्यात आलेल्या क्षेत्रांसाठी नैसर्गिक वायूच्या किमतींचा सरकार दर सहा महिन्यांनी आढावा घेते.
पुढील महिन्यात उडू शकतो सीएनजी आणि पीएनजीचा भडका
1 ऑक्टोबर रोजी पुढील पुनरावलोकन होणार आहे. आयसीआयसीआय सिक्योरिटीजने म्हटले आहे की 1 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंत APM किंवा अॅडमिनिस्टर्ड रेट 3.15 डॉलर प्रति युनिट पर्यंत वाढेल. सध्या हा दर प्रति युनिट $ 1.79 आहे. रिपोर्टनुसार, ‘एपीएम गॅस किंमतीत झालेली वाढ सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन (CGD) कंपन्यांसाठी आव्हान असणार आहे.
याचा अर्थ असा की याकरिता सीएनजी आणि पीएनजीचा खर्च वाढेल. एपीएम गॅसच्या किमती वाढल्यामुळे दिल्ली आणि आसपासच्या भागात सीएनजीचे वितरण करणारी कंपनी इंद्रप्रस्थ गॅस लि. ला पुढील एका वर्षात किमतींमध्ये प्रचंड वाढ करावी लागेल. मुंबईत सीएनजीचा पुरवठा करणाऱ्या एमजीएललाही असेच पाऊल उचलावे लागेल. शहर गॅस वितरण कंपन्यांना किमती 10-11 टक्क्यांनी वाढवाव्या लागतील.
