किरीट सोमय्यांच्या रडारवर शिवसेनेचा नेता आणि राष्ट्रवादीचा मंत्री


मुंबई: ठाकरे सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. शिवसेनेचा एक नेता आणि राष्ट्रवादीचा एक मंत्री आपल्या रडारवर असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे. या दोन्ही नेत्यांचे भ्रष्टाचार येत्या सोमवारी उघड करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. पण, या दोन्ही नेत्यांची नावे त्यांनी गुलदस्त्यात ठेवली आहेत. त्यामुळे हे दोन नेते कोण? यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. किरीट सोमय्या यांनी हा दावा टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखती दरम्यान केला आहे.

माझ्याकडे दोन गठ्ठे आहेत. 24 हजार पाने पहिल्या गठ्ठ्यात आहेत. त्यात ठाकरे सरकारच्या एका नेत्याचा घोटाळा आहे. दुसरा जो गठ्ठा आहे, त्यात चार हजार पाने आहेत. तो शरद पवार यांच्या एका मंत्र्याच्या घोटाळ्याचा आहे. देवेंद्र फडणवीस याबाबत दिल्लीत चर्चा करणार आहेत. मला त्यांनी सूट दिलेली आहे. ही नावे सोमवारी उघड करणार असून तुम्ही चांगले काम करत आहात. तुमच्या सुरक्षेची जबाबदारी आमची असल्याचे फडणवीसांनी मला सांगितले आहे. त्यामुळे मला सुरक्षा मिळालेली आहे आणि मला सर्व अधिकार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

त्यांनी यावेळी महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या मुद्द्यावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनाही घेरले. उत्तर आणि प्रत्युत्तर द्यायला हा काय मुशायरा नाही. महाराष्ट्राची ठाकरे सरकार आणि आधीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने वाट लावली. त्यामुळे घोटाळेबाज मंत्र्यांना शिक्षा व्हावी हा उद्देश आहे. एखादा कुठला तरी निकाल आला की काही मंत्र्यांना चार दिन की चांदनी असे वाटते. त्यांना पाच- पंधरा दिवस शेरोशायरी करू द्या, असा चिमटा सोमय्या यांनी काढला.

सर्वोच्च न्यायालयाने ज्या कारणामुळे तुरुंगात डांबले, ती केस अजूनही सुरूच आहे. छगन भुजबळ यांना एवढेच सांगायचे की एवढ्या उड्या मारू नका. 120 कोटी रुपये रोख दिले गेले आहेत, महाराष्ट्र सदन घोटाळ्याचे नव्हते, तर कुठल्या नवनाथ घोटाळ्याचे होते ते सांगा, असा सवाल त्यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांचे सरकार हे सेटिंगबाजांचे सरकार आहे. बेनामी संपत्ती होती त्यात भुजबळ राहत होते. आताही राहतात तो बंगला कोणाचा आहे? मी म्हणालो ना, चार दिन की चांदनी आहे. त्याचा आनंद थोडा दिवस घेऊ द्या. जे त्यांनी गेली पाच वर्ष सहन केले आहे. त्यामुळे ते आनंद व्यक्त करत असतील. शेरोशायरीत मला जायचे नाही. कारण ही लूट आहे.

मंत्री आणि सरकार शेरोशायरी करत असतील, पण सोमय्या महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला जबाबदार आहे. त्यामुळे भुजबळांचे 120 कोटींची चोरी आम्ही पकडून दिल्याचे सांगतानाच शेरोशायरी नाही, 120 कोटी कुठून आले ते सांगा? राजमहलमध्ये राहता, तो राजमहल कुणाचा आहे ते सांगा?, असा सवालही त्यांनी केला.