महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आठवड्याभरात कृती आराखडा तयार करा – सतेज पाटील


मुंबई : राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आठवड्याभरात कृती आराखडा तयार करा असे निर्देश परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिले. राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या अनुषंगाने दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस विभागीय आयुक्त सौरभ राव, परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, महामार्ग पोलिस दलाचे अधिकारी व सेव्ह लाईफ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पियुष तिवारी आदी उपस्थित होते.

पुणे-सातारा आणि सातारा-कागल महामार्गावर २०१९-२० या एका वर्षांमध्ये विविध कारणांमुळे झालेल्या रस्ते अपघातांमध्ये तब्बल १२५ नागरिकांनाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा कॉरिडर ‘शून्य मृत्यू कॉरिडॉर’ बनविण्यासाठी तसेच राज्यातील सर्व महामार्ग, राज्यमार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित बनविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, आपण सर्वांनीही वाहतुकीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन राज्यमंत्री पाटील यांनी केले.

सेव्ह लाईफ संस्थेने एनएच-४८ या महामार्गावर पाहणी करून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाला सादर केलेल्या अहवालावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. या अहवालामध्ये अभियांत्रिकी, अंमलबजावणी, आपत्कालीन प्रतिसाद आणि आवश्यक प्रशिक्षणाबाबत सविस्तर शिफारशी करण्यात आल्या आहेत. या सर्व शिफारशीची अंमलबजावणी करण्यासाठी एका आठवड्यामध्ये कृती आराखडा बनविण्याच्या सूचना पाटील यांनी केल्या.

अतिवेग, सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट न घालणे, अचानक लेन बदलणे, इंडिकेटर्स, हेडलाईट सुस्थितीत नसणे आदी कारणांनी अपघात होत आहेत. या सर्व बाबींचा सविस्तर विचार करून योग्य त्या सर्व उपायोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याचसोबत, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर पोलीस प्रमुखांना महामार्गावर २४x७ साठी पेट्रोलिंगसाठी प्रत्येकी एक समर्पित गाडी व टीम तयार करून तत्काळ पेट्रोलिंग सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आगामी काळात महामार्गावर माहिती तंत्रज्ञान आधारित पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे असेही राज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

रस्त्यांवरील अपघातामध्ये दुर्दैवाने मृत्यू झालेल्यांपैकी बहुदा तरुण असतो, कुटुंबाचा आधार असतो, हे नुकसान कधीही भरून न निघणारे असते. अपघात हे नैसर्गिक कारणानेही होतात पण ९० टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे होत असल्याचे अनेक अहवालातून समोर आले आहे अशी माहितीही यावेळी देण्यात आली.