गणेशोत्सव कशासाठी?

ganesha3
गणेशोत्सव सुरू झाला की वातावरणात चैतन्य निर्माण होते. विशेषतः शहरी भागामध्ये राहणारे लोक फार उत्साहाने पेटून उठतात. कारण आपले जीवनमान बदलत चालले आहे. आपण साचेबंद होत चाललो आहोत. आपल्या कामाच्या ठिकाणाहून घरी आलो आणि घराचे दार एकदा बंद झाले की समोरच्या किंवा शेजारच्या घराशीसुध्दा आपला संबंध नसतो. शेजारी कोणी आजारी आहे, कोणी संकटात आहे याचेसुध्दा आपल्याला भान राहत नाही. अलीकडच्या या वातावरणाने समाज म्हणून संघटित जगण्याचे आपले वळण बदलत चालले आहे. मात्र एकमेकांची तोंडेसुध्दा न पाहणारे आणि समोर आल्यास नमस्कारसुध्दा न करणारे शहरातले हेच आत्मलीन लोक गणपती आला की एकदम खुलतात. वस्त्या आणि कॉलन्यातली तरुण मुले आणि मुली गणपतीच्या निमित्ताने असा काही जल्लोष करतात की आपल्या घराचे दरवाजे तर उघडतातच पण मनाची कवाडेसुध्दा उघडून आपण जल्लोषात सहभागी होतो. माणूस माणसाच्या जवळ येतो. जवळ राहत असूनही दोन व्यक्तींच्यामध्ये उभ्या असलेल्या भिंती कोसळतात. गणेशोत्सव समाजाला संघटित करतो.

लोकमान्य टिळकांना असेच काहीतरी जाणवले असणार आणि म्हणून त्यांनी त्यांच्या संघटक बुध्दीमत्तेचा आविष्कार घडवून गणेशोत्सवाचा पायंडा पाडला आणि तो सुरू आहे. पण उत्सवाच्या धामधुमीत हा उत्सव नेमका आहे कशासाठी याचाच विसर पडत चालला आहे की काय याची शंका येते. कारण उत्सवामुळे माणूस माणसाजवळ येतो हे तर अनुभवाला येत आहेच पण जवळ आलेली ही माणसे कशासाठी जवळ येतात आणि जवळ येऊन काय साध्य करायचे आहे याचेच जर भान नसेल तर गणेशोत्सवातला हा सारा जमावडा निरर्थक ठरेल. लोकांचा हा पैसा, ऊर्जा, वेळ हे सारे खर्च करून काहीच साध्य होणार नसेल आपण कधीतरी या उत्सवाच्या हेतूकडे सिंहावलोकन करून पाहिले पाहिजे. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला हा गणेशोत्सव आता फार व्यापक झाला आहे. तो अनेक जण साजरा करत आहेत आणि अनेक मंडळे गणपती बसवत आहेत. या अर्थाने तो व्यापक झाला असला तरी त्याच्या हेतूच्या अंगाने विचार केला असता तो संकुचित होत चालला असल्याचे दिसते. लोकमान्य टिळकांनी ज्या काळात शिवजयंती आणि गणेशोत्सवाचा आग्रह धरला त्या काळात लोकांना एकमेकांच्या जवळ आणण्याचा उपाय म्हणून त्याकडे पाहिले गेले. हिंदू समाजाच्या इतिहासावर एक नजर टाकली तर या समाजातले काही दोष ठळकपणे समोर येत असत आणि या दोषांमुळेच या समाजावर जवळजवळ हजार वर्षे बाहेरच्या लोकांनी राज्य केलेले आहे.

मुठभर परकीय लोक येऊन आपल्याला गुलाम बनवतात आणि आपण सुद्धा त्या गुलामगिरीतच धन्यता मानतो, ही आपली अवनती आहे. त्या अवनीतीची कारणे शोधण्यासाठी आपण एकत्र येत नाही आणि जोपर्यंत तिच्यावर चर्चा करत नाही तोपर्यंत आपली परिस्थिती बदलणे शक्य नाही आणि गुलामगिरीतून सुटका होणेही शक्य नाही हे टिळकांना जाणवत होते. किंबहुना हिंदू समाजामध्ये संघटनदारिद्य्र फार मोठ्या प्रमाणावर होते आणि त्याच्या सर्वंकष अध:पतनाचे ते एक कारण होते. जोपर्यंत समाज संघटित होत नाही आणि तो स्वत:च्या उन्नतीबाबत विचार करत नाही, कृती करत नाही तोपर्यंत तो सतत अवनत अवस्थेतच जगत राहणार हे टिळकांनी लोकांना समजावून सांगायला सुरुवात केले आणि त्यासाठी त्यांनी गणेशोत्सवाची सुरूवात केली. इंग्रजांना ही गोष्ट चांगलीच माहीत होती. म्हणून ब्रिटीश सरकार भारतीयांना संघटित होऊ देत नव्हते. १ म्हणून टिळकांनी धार्मिक उत्सवालाच जनतेच्या उत्सवाचे स्वरूप दिले. त्यामुळे सरकारला त्यावर बंदी घालता आली नाही. लोक एकमेकांच्या जवळ यायला लागले, परस्परांशी बोलायला लागले आणि स्वदेश, स्वभाषा, स्वधर्म याविषयी त्यांच्यात हळू हळू अभिमान निर्माण व्हायला लागला.

एखादा समाज जेव्हा निद्रिस्त अवस्थेत असतो तेव्हा त्याला जागे करण्यासाठी अशाच उपायांची गरज असते. १७ व्या शतकात महाराष्ट्रात झालेली राजकीय क्रांती अशाच प्रकारची होती. शिवाजी महाराजांची स्वराज्याची स्थापना केली, पण ती स्थापना महाराष्ट्रातल्या संतांनी घडवलेल्या सामाजिक बदलाच्या पार्श्‍वभूमीवर झाली होती. लोकमान्य टिळकांच्या पूर्वी न्या. रानडे यांनी समाजात संस्था निर्माण झाल्या पाहिजेत, हे आग्रहाने प्रतिपादन केले होते आणि त्यांच्या प्रेरणेनेच महाराष्ट्रात विविध संस्थांची स्थापना होऊन लोक संघटित होऊ लागले होते. त्याच प्रक्रियेला लोकमान्य टिळकांनी व्यापक स्वरूप दिले. न्या. रानडे यांच्या प्रयत्नातून अनेक संस्था स्थापन झाल्या तरी त्यामध्ये समाजातला सुशिक्षित आणि उच्चवर्णीय वर्गच जागृत होत होता आणि संघटित होत होता. लोकमान्य टिळकांनी हीच प्रक्रिया सामान्य जनापर्यंत नेऊन पोचवली आणि त्यासाठी गणेशोत्सवाचा वापर केला. हा सारा इतिहास आहे. आज आपल्या समाजात अनेक उत्सव साजरे होत आहेत. विविध संघटना, संस्था स्थापन होऊन सार्वजनिक जीवनाला भरभराटीचे रूप आलेले आहे. तरी सुद्धा गणेशोत्सवा इतका अन्य कोणत्याही उपक्रमात एवढा जनसमुदाय सहभागी होत नाही. हे गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य अजूनही टिकून आहे. कारण गणेशोत्सवात समाजाचे सर्व वर्ग सहभागी होऊ शकतात. असे असले तरी गणेशोत्सवाच्या निमित्ताने समाजातल्या विविध वर्गांमध्ये आपल्या अवस्थेविषयी जेवढा गांभीर्याने आणि सखोलपणे विचार व्हायला हवा तेवढा तो आजच्या गणेशोत्सवात होत नाही. मिरवणुकीला महत्त्व असते पण विचारमंथनाला दुय्यम स्थान असते.

Leave a Comment