प्रगतीपथावरील कामे कालमर्यादेत पूर्ण करा – शंकरराव गडाख


मुंबई : महाड विधानसभा मतदारसंघातील प्रगतीपथावरील जलसंधारण विभागांतर्गत येणाऱ्या प्रकल्पांची कामे कालमर्यादेत पूर्ण करा, अशा सूचना मृद व जलसंधारण मंत्री शंकराव गडाख यांनी दिल्या. मंत्रालयात महाड विधानसभा मतदारसंघातील कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार महेंद्र थोरवे, मृद व जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांच्यासह मृद व जलसंधारण विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

जलसंधारण मंत्री गडाख म्हणाले, महाड तालुक्यात एकूण 1 लघु पाटबंधारे योजना व अकरा सिमेंट काँक्रीट बंधारे कार्यान्वित आहेत या योजना महामंडळांतर्गत असून पैकी एक लघु पाटबंधारे पूर्ण झालेले आहे व ११ योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. या योजनांमुळे स्थानिक शेतीसाठी व उन्हाळ्यात लोकांकरिता पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. महाड तालुक्यातील ११ सिमेंट काँक्रिट बंधाऱ्याचे काम प्रगतीपथावर असून पूर्ण झाल्यानंतर 485 द.ल.घमी. पाणीसाठा होणार आहे व ६५ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे, तसेच जिते बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले असून हा बंधारा ग्रामपंचायतीस हस्तांतरित करण्यात आलेला आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

जलसंधारण मंत्री गडाख यांनी महाड तालुक्यातील सर्व कामांचा आढावा घेतला. दुरुस्ती करण्यात येणाऱ्या प्रकल्पांची कामे तातडीने करण्यात यावीत. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. जलसंधारण अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांचा अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.