ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, गायक आणि पखवाजवादक यांनाही मिळणार पाच हजाराचे मानधन


पंढरपूर : कोरोना काळात अडचणीत सापडलेल्या राज्यातील 48 हजार कलावंतांना महिना पाच हजार रुपयांचे मानधन देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता यात सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने वारकरी संप्रदायाचाही समावेश केला असून वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, गायक आणि पखवाजवादक यांनाही पाच हजाराचे मानधन मिळणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्यासोबत वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी बैठक घेतली होती. यात वारकरी संप्रदायाची कोरोनाकाळात दुरावस्था झाल्याचे विठ्ठल पाटील यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले आणि राज्यातील कलावंतांमध्ये वारकरी संप्रदायाचा समावेश करण्याची मागणी केली.

राज्य सरकारने यास सकारात्मक प्रतिसाद देत वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, गायक आणि पखवाजवादक यांचा यात समावेश करून घेण्याची घोषणा केली. आता राज्य सरकारकडून राज्यातील कीर्तनकार, गायक आणि पखवाजवादक यांचे सर्वेक्षण करून त्यांना कोरोना काळात पाच हजार रुपयांचे महिना मानधन मिळण्यास सुरुवात होणार आहे. राज्यात सध्या 10 हजारापेक्षा जास्त वारकरी कीर्तनकार, गायक आणि पखवाजवादक असून या घोषणेमुळे सर्वांना कोरोना काळात महिन्याला पाच हजाराचे मानधनाचा फायदा होऊ शकणार आहे.

याच सोबत या बैठकीत राज्यातील पारंपरिक वारकरी फड प्रमुखाला कायमस्वरूपी मानधन देण्याची घोषणा देखील करण्यात आली असून संत विद्यापीठासह इतर मागण्या देखील राज्य सरकारने तत्वतः मान्य केल्याचे वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी सांगितले आहे.