दादासाहेब फाळके चित्रनगरीचा पुनर्विकास करण्यात येणार – अमित देशमुख


मुंबई : दादासाहेब फाळके चित्रनगरी अर्थात फिल्मसिटी येथे सध्या अनेक मराठी आणि हिंदी मालिका आणि सिनेमांचे चित्रीकरण मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. त्यामुळेच लवकरच अत्याधुनिक आणि चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधांचा अभ्यास करुन फिल्मसिटीचा पुनर्विकास करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दादासाहेब फाळके चित्रनगरी (फिल्मसिटी) संदर्भात बैठक झाली. या बैठकीला चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालिका मनीषा वर्मा, सल्लागार अजय सक्सेना, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानीबरोबरच सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. आज मनोरंजन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विस्तारले असून फिल्मसिटीमध्ये दरदिवशी वेगवेगळ्या माध्यमांसाठी चित्रीकरण होत असते. या माध्यमांची आवश्यकता लक्षात घेऊन पुर्नविकास याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. सध्या आपण सर्वच कोविडशी मुकाबला करीत आहोत.

येणाऱ्या काळात सांस्कृतिक क्षेत्राचा विस्तार करीत असताना प्राधान्याने फिल्मसिटीचा पुर्नविकास करणे गरजेचे आहे. नव्याने करण्यात येणारा पुनर्विकास कसा असेल, त्याचे टप्पे कसे असतील, पुनर्विकास करीत असताना कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जाणार आहेत, पुनर्विकासाचा टप्पा किती वर्षांचा असेल अशा सर्व बाबींवर चर्चा यावेळी करण्यात आली.