…तर संपूर्ण महाराष्ट्रात निर्बंध लागू होतील; विजय वडेट्टीवारांचे वक्तव्य


नागपूर – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लावण्यासंदर्भातील चर्चा सध्या रंगली आहे. राज्य सरकारने गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळात संभाव्य गर्दी टाळण्याच्या उद्देशाने पुन्हा निर्बंध कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन-तीन दिवसांत याबाबतची नियमावली जाहीर करण्यात येण्याचे संकेत आहेत. दरम्यान नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी नियमावली जाहीर होण्याआधीच कठोर निर्बंध लागू होतील अशी घोषणा केली. पण राऊत यांचा हा दावा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री यांनी फेटाळला आहे. यामुळे काँग्रेस नेत्यांमध्येच दुमत असल्याचेही समोर आले आहे.

नितीन राऊत यांनी सोमवारी सायंकाळी तिसरी लाट थोपवण्यासाठी निर्बंध कठोर करण्याबाबतची नियमावली जाहीर होण्याआधीच तातडीने पत्रकार परिषद घेतली. शहरात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवून दोन- तीन दिवसांनंतर पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याची घोषणा त्यांनी केली होती. कोरोनाबाधितांची जी आकडेवारी समोर आली आहे, ती लक्षात घेता शहरात आणि ग्रामीण भागात पुन्हा कडक निर्बंध लावावे लागणार आहेत. एकेरी आकडा आता दुहेरी झाला असून १३ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आपण पावले टाकत असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते. याआधी ८ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांनी जाहीर करण्यापूर्वीच नागपुरातील खासगी शिकवणी वर्ग व दुकानांच्या वेळेत वाढ करण्याची घोषणा नितीन राऊत यांनी केली होती.

दरम्यान नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना नितीन राऊत यांचा दावा विजय वडेट्टीवार यांनी फेटाळला आहे. निर्बंध कडक करणारच अशी भूमिका कोणी स्वीकारलेली नाही. पण मुख्यमंत्र्यांनी सूतोवाच केले आहे. तिसरी लाट येत असून जर लोकांनी सहकार्य केले नाही, गर्दीपासून दूर राहिले नाही, तर संभाव्य धोका लक्षात घेता निर्बंध कडक करावे लागतील असे त्यांचे मत आहे.

पालकमंत्री म्हणून नितीन राऊत यांनी नागपूरबाबत भाष्य केले असेल. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली असेल, पण मला माहिती नाही. पण निर्बंध लागले तर एकट्या नागपुरात नाही तर महाराष्ट्रात लागतील. शेवटी कोरोनाबाधितांच्या संख्येवरच सर्व काही अवलंबून असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. राज्यात कोरोना प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. मुंबईसह अन्य शहरांत दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ नोंदविण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या काळात संसर्ग अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. गेल्या वर्षीही सणासुदीनंतरच कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर काही निर्बंध लागू केले जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत आगामी सणासुदीच्या काळात होणारी गर्दी कशी टाळता येईल, यावर चर्चा करण्यात आली.

राज्यातील बहुतांश शहरांमधील बाजारपेठांमध्ये गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. काही कठोर पावले उचलली नाही, तर गणेशोत्सवाच्या काळात गर्दी वाढेल व संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यातूनच काही निर्बंध लागू केले जातील. गौरी-गणपती विसर्जनानंतर अनंत चतुर्दशीपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सवाला भेट देणाऱ्यांची गर्दी वाढते. त्यामुळे गौरी-गणपती विसर्जनानंतर जमावबंदी व रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सरकारची योजना आहे.

त्यानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. रात्री बाहेर पडण्यावर निर्बंध लागू केले जाणार आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपांमध्ये दर्शन बंद केले जाईल. परिणामी मंडपांमध्ये गर्दी होणार नाही. महानगरपालिकांना या संदर्भातील आदेश काढण्यास सांगण्यात आले आहे. लवकरच मुख्यमंत्री गणेशोत्सवाबाबत नियमावली जाहीर करणार असल्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रात्रीची संचारबंदी तसेच उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा कमी करण्याबाबत विचार सुरू असल्याचे संकेतही त्यांनी दिले.