सरसंघचालकांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणतात…


पुणे – सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी मुंबई येथे दुसऱ्या मताचा अनादर केला जात नाही, पण मुस्लिमांच्या नाही, तर भारताच्या वर्चस्वाचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे, असे परखड मत मांडले होते. तसेच सर्व भारतीयांच्या एकतेचा आधार आपली मातृभूमी व देशाच्या गौरवशाली परंपरा आहेत. भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुसलमानांचे पूर्वज एकच आहेत. आपल्या दृष्टीने हिंदू हा शब्द आपली मातृभूमी, पूर्वज आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रतिशब्द आहे. म्हणूनच आम्ही प्रत्येक भारतीय नागरिक हिंदूच असल्याचे मानतो असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले होते. त्यानंतर यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना भाष्य केले आहे.

काल मोहन भागवत म्हणाले की, या देशातील हिंदू आणि मुस्लिम एकच समजतो याचा अर्थ नेमका काय घ्यायचा, असा सवाल पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला. त्यावेळी आता एक नविनच गोष्ट त्यांनी सांगितली की दोन्ही समाजांचा मूळ जन्म हा एकाच कुटुंबातून झाला आहे. ते वाचून माझ्याही ज्ञानात भर पडल्याचे शरद पवार यांनी म्हटले.

सरसंघचालक भागवत यांच्यासमवेत केरळचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान, काश्मीर केंद्रीय विद्यालयाचे कुलपती लेफ्टनंट जनरल सय्यद अटा हुसेन सोमवारी ‘ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाऊंडेशन’तर्फे मुंबईत ‘राष्ट्र प्रथम-राष्ट्र सर्वतोपरी’ परिषदेत उपस्थित होते. भागवत व अन्य मान्यवरांनी मुस्लिम समाजातील बुद्धिजीवी व विचारवंतांशी संवाद साधला होता.