१८०० चाकरमान्यांना घेऊन मुंबईहून सावंतवाडीला रवाना झाली ‘मोदी एक्सप्रेस’


मुंबई – गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या १८०० चाकरमान्यांना घेऊन ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणाकडे रवाना झाली आहे. या ट्रेनला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजप आमदार नितेश राणे यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही ट्रेन दादर स्थानकावरुन सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाली आहे. या ट्रेनमधील प्रवाशांनी गणपतीची आरती म्हणत प्रवासाला सुरुवात केल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नितेश राणेंनी या ट्रेनसंदर्भात काही दिवसांपूर्वीच घोषणा केली होती.


आज या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्याआधीचे काही फोटो नितेश राणेंनी ट्विटरवरुन पोस्ट केलेत. यामध्ये गाडीवर ‘मोदी एक्सप्रेस’ विशेष ट्रेन असे स्ट्रीकर लावल्याचे दिसत आहे. मोदीजींच्या संकल्पनेतून २२५ ट्रेन आम्ही कोकणवासीयांसाठी सोडल्या आहेत. महाराष्ट्रात गणपती उत्सव अत्यंत आनंदाने साजरा केला जातो. आता ही रेल्वे कोकणात जाणार आहेत. या रेल्वेमुळे कोकणवासी खूश असल्याचे मत यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले.


मी आपल्यासाठी दरवर्षी गणपतीला बसेस सोडतो. पण आम्ही यावर्षी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणार आहोत. केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंना स्थान देऊन नरेंद्र मोदींनी कोकणाला आशीर्वाद दिला असल्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी गणेश चतुर्थीसाठी मोदी एक्सप्रेस सोडत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांनी दिली होती. १८०० नागरिकांसाठी ही ट्रेन सोडण्यात आली असून दादरहून कणकवली, वैभववाडी आणि सावंतवाडीपर्यंत धावणार आहे. प्लॅटफॉर्म नंबर ८ वरुन ही ट्रेन सुडण्यात आली आहे. मोठ्या उत्साहामध्ये या गाडीमधील गणेशभक्तांनी या सेवेबद्दल आनंद व्यक्त करताना गणरायाची आरती गात प्रवासाला सुरुवात केली. मुंबई ते सावंतवाडी या प्रवासात मोदी एक्सप्रेसमध्ये सर्व प्रवाशांना एक वेळचे जेवणदेखील दिले जाणार असल्याचे याआधीच सांगण्यात आले आहे.