
नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने १२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षा (National Eligibility-cum-Entrance Test ) पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. NEET UG परीक्षा २०२१ दुसऱ्या तारखेला घेण्याबाबतची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. याचिकाकर्त्याने म्हटले होते की NEET परीक्षेची तारीख सीबीएसई कंपार्टमेंट व अन्य परीक्षेच्या तारखा सारख्या असल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. पण, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की येत्या रविवारी, १२ सप्टेंबर रोजी NEET परीक्षा निर्धारित वेळेवर घेतली जाईल.
सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली NEET परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका
न्यायालयाने म्हटले की, १६ लाखांहून अधिक विद्यार्थी NEET परीक्षेला बसतात आणि केवळ काही विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून ही परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकत नाही. न्यायमूर्ती ए एम खानविलकर, न्यायमूर्ती हृषिकेश रॉय आणि न्यायमूर्ती सीटी रवी कुमार यांच्या खंडपीठाने म्हटले की, या याचिकेवर आम्ही सुनावणी घेणार नाही. आम्हाला अनिश्चिततेची परिस्थिती नको आहे. परीक्षा होऊ द्या. परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका अॅड सुमंत नकुलाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.
न्यायालयाने असेही म्हटले आहे की, शिक्षणाच्या बाबतीत जास्त हस्तक्षेप करण्याची इच्छा नाही कारण लाखो विद्यार्थी त्यांच्या आदेशामुळे प्रभावित होतील. त्याचबरोबर याचिका फेटाळताना न्यायालयाने म्हटले, आम्हाला खरोखरच न्यायालयीन हस्तक्षेपाची व्याप्ती निश्चित करण्याची गरज आहे. या विद्यार्थ्यांनी हवे, तर मध्यरात्री जागून तयारी करावी. न्यायालय म्हणून आम्ही किती हस्तक्षेप करू शकतो.
