सौंदर्यासाठी तांदुळाचा करा असा वापर


तांदूळ हे धान्य भारतीय खाद्यसंस्कृतीचे अभिन्न्न अंग आहे. घराघरामध्ये दररोजच्या आहारामध्ये समाविष्ट असणारा हा पदार्थ आहे. तांदुळाचा वापर केवळ भात तयार करण्यासाठी नाही, तर विविध प्रकारचे पुलाव, इडली, डोसा, घावने, खीर अश्या अनेक व्यंजनांमध्ये केला जात असतो. हे धान्य पौष्टिक आहेच, पण त्याशिवाय हे धान्य केसांच्या आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे. केस आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी तांदुळाचा वापर केवळ भारतातच नाही, तर अनेक देशांमध्ये केला जात आला आहे. विशेषतः आशियाई देशांमध्ये तांदुळाचा वापर सौंदर्यप्रसाधन म्हणून फार प्राचीन काळापासून होत आला आहे. आठव्या शतकामध्ये जपानी राजवंशातील महिला आपले लांबसडक केस धुण्यासाठी तांदुळाच्या पाण्याचा वापर करीत असत. त्याचप्रमाणे चीनमधील ‘रेड याओ’ या हुंग्लाओ प्रांतामध्ये राहणाऱ्या आदिवासी जमातीतील स्त्रियांच्या नावे, समस्त जगातील लांबसडक केस असण्याचा विक्रम नोंदलेला आहे. याही स्त्रिया केसांसाठी तांदुळाच्या पाण्याचा वापर करीत असतात. तांदुळाच्या पिठाचा वापर त्वचेसाठी केला जाण्याची परंपरा देखील तितकीच प्राचीन आहे. जपानी महिला तांदुळाच्या साळी लहान लहान पिशव्यांमध्ये भरून त्याने आपली त्वचा ‘पॉलिश’ करत असत.

तांदुळाचा वापर त्वचेवरील मृत पेशी हटविण्यासाठी, त्वचेचे ‘क्लेन्सिंग’ करण्यासाठी, आणि उन्हापासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी केला जाऊ शकतो. चेहऱ्यावरील मुरुमे पुटकुळ्या नाहीश्या करून त्वचा नितळ करण्याचे काम तांदुळाचे पीठ करते. तांदुळाच्या पाण्याचा वापर केसांच्या उत्तम वाढीसाठी आणि केसांचे अकाली पिकणे रोखण्यासाठी केला जात असतो. याच्या वापराने केसांतील कोंडा कमी होण्यासही मदत होते. ज्यांची त्वचा तेलकट असेल, त्यांनी तांदुळाच्या पिठाचा वापर चेहऱ्यावर करावा. यासाठी दोन मोठे चमचे तांदुळाचे पीठ आणि एक मोठा चमचा कॉर्न फ्लोर एकत्र करावे.

या मिश्रणाचा वापर चेहऱ्यावर वापरण्याच्या टाल्कम पावडरप्रमाणे करावा. चेहऱ्यावरील मृत पेशी वेळोवेळी न हटविल्या गेल्याने त्वचा निस्तेज दिसू लागते. तसेच या मृत पेशींमुळे चेहऱ्यावरील रंध्रे ‘ब्लॉक’ झाल्याने त्वचेवर मुरुमे येण्याचे प्रमाण वाढू लागते. या मृत पेशी चेहऱ्यावरून हटविण्यासाठी अर्धा कप तांदुळाचे जाडसर पीठ, पाव कप बेसन, आणि अर्धा चमचा हळद एकत्र करावे. हे मिश्रण घट्ट झाकणाच्या बरणीमध्ये भरून ठेवावे. याचा वापर करण्यासाठी एक चमचा भरून मिश्रणामध्ये एक मोठा चमचा गुलाबजल मिसळून घट्ट पेस्ट बनवावी. या पेस्टने चेहऱ्यावर हलक्या हातांनी मालिश करावी. काही मिनिटे मालिश केल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.

त्वचा स्वच्छ धुतल्यानंतर त्वचेची रंध्रे मोकळी होतात. ही रंध्रे खुली राहिली, तर त्यामध्ये पुन्हा विषारी घटक शिरून त्वचेवर मुरुमे येऊ शकतात. त्वचा स्वच्छ केल्यानंतर खुली झालेली रंध्रे पुन्हा बंद करण्यासाठी तांदुळाच्या पाण्याचा वापर ‘फेशियल टोनर’ म्हणून करता येतो. यासाठी एक कप तांदूळ पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यावेत आणि त्यानंतर दीड कप पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून ठेवावेत. अर्धा तास झाल्यानंतर तांदुळाचे पाणी गाळून घेऊन या पाण्याचा वापर फेशियल टोनर म्हणून करता येऊ शकेल. या पाण्याच्या वापराने त्वचेवरील रंध्रे बंद होतात, नव्या पेशी तयार होण्यास चालना मिळते, आणि त्वचेतील आर्द्रता टिकून राहून त्वचेचा रंगही उजळतो. याच पाण्याचा वापर, केस शँपूने धुवून झाल्यानंतर ‘लास्ट रिन्स’ म्हणून करता येतो. हे पाणी अधिक गुणकारी बनविण्यासाठी यामध्ये ग्रीन टीदेखील घालता येऊ शकेल. हे पाणी केसांवर ओतल्यानंतर दहा मिनिटे केसांवर राहू द्यावे आणि त्यानंतर केस पुन्हा साध्या पाण्याने धुवावेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment